भाजपने आम्हाला विरोध केला तर शिवसैनिक त्याचा पूर्ण हिशोब घेतील – महायुतीतील मंत्र्याचा इशारा

| Updated on: Oct 03, 2024 | 8:26 AM

मात्र निवडणुकांची तारीख घोषित होण्यापूर्वीच महायुतीमध्ये जागावाटपावरून धूसफूस सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीच्या अनेक नेत्यांमध्ये बेबनाव असून नुकताच महायुतीतील एका मंत्र्यांने भाजपला थेट इशारा दिला आहे

भाजपने आम्हाला विरोध केला तर  शिवसैनिक त्याचा पूर्ण हिशोब घेतील - महायुतीतील मंत्र्याचा इशारा
महायुतीतील मंत्र्याचा इशारा
Follow us on

विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात येत आहे. महायुतीमध्येही निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातही जागावाटपावरून खलबत सुरू आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नुकतेच मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी राजकीय परिस्थिती, जागा वाटप, जागा वाटपातील अडचणी आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला यावर चर्चा केल्याची चर्चा आहे. त्यानंतर त्यांन अजित पवार यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याचं समजतं.

मात्र निवडणुकांची तारीख घोषित होण्यापूर्वीच महायुतीमध्ये जागावाटपावरून धूसफूस सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीच्या अनेक नेत्यांमध्ये बेबनाव असून नुकताच महायुतीतील एका मंत्र्यांने भाजपला थेट इशारा दिला आहे. ‘ भारतीय जनता पक्षाने विरोध केला तर आमचे शिवसैनिक पूर्ण हिशोब घेतील’ असा इशारा महायुतीमधील नेते, मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. सिल्लोडमध्ये भाजपने अब्दुल सत्तार याना विरोध करायला सुरुवात केल्यानंतर अब्दुल सत्तारांनीही मागेपुढे न बघता भाजपला इशारा दिलाय. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे असून महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढू शकते.

अब्दुल सत्तार यांचा भाजपला सज्जड इशारा

‘एक लक्षात घ्या, त्यांनी विरोध केला तर आमचे शिवसेनावालेही त्यांचा पूर्ण हिशोब करतील. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील, त्याच पद्धतीने आम्हीही पूर्ण मराठवाडाभर, महाराष्ट्रभर काम करू. सिल्लोड मध्ये जर मला विरोध केला तर संपूर्ण मराठवाड्यात शिवसेनाही तसंच वागणार,’ अशा शब्दात सत्तार यांनी इशारा दिला आहे. j

यावर आता भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया येते, महायुतीमधील तिढा वाढू नये यासाठी वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, नेते, कार्यकर्त्यांची कशी समजूत काढतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला या आठवड्यात ठरणार

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला या आठवड्यात ठरणार आहे. भारतीय जनता पक्ष 155 जागा लढवण्यावर ठाम आहे. तर शिंदे गट आणि अजित पवार गटानेही आपल्या वाट्याला अधिक जागा याव्यात यासाठी आग्रह धरला आहे. शिंदे गटाकडून 80 जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र तसे झाल्यास अजित पवार गटाला फक्त 53 जागा मिळतील, त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे पक्षाला आमदारांच्या पक्षांतराचा धोका असल्याची भीती पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी व्यक्त केल्याचे समजते. आपल्याला निवडणुकीत 70 जागा मिळाव्यात अशी अजित पवार गटाची मागणी आहे. त्यावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.