नाशिक : यवतमाळहून (yavatmal) मुंबईला (Mumbai) जाणाऱ्या ट्रॅव्हलचा नाशिकच्या (Nashik accident) नांदूरनाका परिसरात भीषण अपघात झाला. बस आणि आयशर ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातानंतर बसने पेट घेतला. या अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही बस चिंतामणी ट्रॅव्हलची होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड चिंतामणी ट्रॅव्हलच्या ऑफीसमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी घटनेची माहिती घेतली आहे. तसेच नाशिकच्या जिल्ह्याधिकाऱ्यांशी देखील बोलंण झाल्याचं राठोड यांनी सांगितलं.
संजय राठोड म्हणाले की, ही बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. नाशिक जवळ या ट्रॅव्हलचा अपघात झाला. यात 11 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर जे जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर शासकीय खर्चातून उपचार सुरू आहेत.
या बसची क्षमता 30 प्रवाशांची आहे. मात्र या बसमधून एकूण 48 प्रवासी प्रवास करत होते. यवतमाळहून बसमध्ये तीसच प्रवासी बसवण्यात आले होते, अशी माहिती समोर येत आहे. मग पुढे चालक आणि कंडक्टर यांनी अतिरिक्त प्रवासी घेतले का यांची चौकशी होणार आहे. चौकशीमध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं राठोड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या अपघातावर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकचा अपघात दुर्दैवी आहे. असे अपघात परत होऊ नये यासाठी उपाययोजना कण्यात येणार असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट कमी करण्याचा प्रयत्नही करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.