पुणे | 21 फेब्रुवारी 2024 : पुण्याजवळील दौंड रेल्वे स्थानक आता मध्य रेल्वेच्या सोलापूर ऐवजी पुणे विभागाला जोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे दौंड रेल्वे स्थानकांतर्गत येणाऱ्या प्रवाशांना होणाऱ्या समस्या आणि गाऱ्हाणी तसेच तक्रारी मांडण्यासाठी पुणे परिसरातील नागरिकांना सोलापूर डीव्हीजनशी पाठपुरावा करावा लागायचा हा त्रास आता वाचणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत ही मागणी केली होती. त्यासाठी अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर अखेर रेल्वे मंत्रालयाने दौंड रेल्वे स्थानक मध्य रेल्वेच्या सोलापूर डीव्हीजन जोडण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे दौंड स्थानक पुणे डीव्हीजनला जोडावे यासाठी पाठपुरावा करत होत्या.अनेक वेळा पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देत त्यांनी हा प्रश्न मांडला होता. प्रवाशांना त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सोलापूरपर्यंत जाणे कसे गैरसोयीचे होते, याबाबत वेळोवेळी त्यांनी नकाशासहीत रेल्वे मंत्रालयाच्या लक्षात आणून दिले होते. इतकेच नाही, तर प्रत्यक्ष लोकसभेतही त्यांनी अनेक वेळा हा विषय उपस्थित केला होता. केंद्र सरकारला याबाबत मागणी केली होती. दौंड येथून रोज पुण्यात येणाऱ्या हजारो रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड स्थानक पुणे विभागाला जोडणे अत्यावश्यक असल्याचे सुप्रिया सुळे त्यांनी सांगितले होते.
येथे पाहा पोस्ट –
हि अतिशय आनंदाची बातमी आपल्यासोबत शेअर करताना मला आनंद होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असणाऱ्या पाठपुराव्याला अखेर यश लाभले असून येत्या १ एप्रिलपासून दौंड रेल्वे स्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे हजारो… pic.twitter.com/NNhdcswRzr
— Supriya Sule (@supriya_sule) February 21, 2024
दौंडमधील हजारो कर्मचारी पुण्यात काम करतात. इतकेच नाही, तर शेतकरी आणि सर्वसामान्य दौंडकरसुद्धा बाजारपेठ आणि इतर कामांसाठी पुण्यालाच प्राधान्य देतात. याशिवाय शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थ्यांचा रोज दौंड ते पुणे असा प्रवास सुरू असतो. या सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडल्यास त्यांच्या अडचणी आणि प्रश्न तातडीने सुटण्यासाठी त्यांना पुणे डीव्हीजन जवळचे आहे असे त्यांनी संसदेत सांगितले होते.
दौंड रेल्वे स्थानक पुणे शहर आणि पुणे विभागीय कार्यालयापासून जवळ आहे. या ठिकाणी येणाऱ्या तांत्रिक अडचणी किंवा काही इतर कामे करण्यासाठी पुण्यातील रेल्वे अधिकाऱ्यांना वेळेत दौंड स्थानकात पोहोचणे शक्य होईल त्यामुळे हे स्थानक पुणे विभागाला जोडावे, अशी मागणी सुळे सातत्याने सरकारकडे करत होत्या. या सततच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून दौंड स्थानक येत्या एक एप्रिल पासून पुणे विभागीय रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.