देशात सर्वत्र रामाने रावणावर म्हणजे दृष्टप्रवृतींवर मिळविलेल्या विजयाची आठवण म्हणून दसऱ्याला रावणाचे दहन केले जात असताना एका आमदाराने चक्क रावणाची आरती करुन नवीन वादाला तोंड फोडले आहे. या आमदाराने केवळ रावणाची आरतीच केली नाही तर रावण दहन प्रथा बंद करण्याची देखील मागणी केली आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजितदादा यांच्या पक्षातील हा आमदार आता चर्चेचा विषय ठरला आहे.
अकोल्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी चक्क रावणाची महाआरती केली आहे. मिटकरी यांनी आरती करुनच न थांबता त्यांनी रावण दहनाच्या परंपरेवर केली बंदीची मागणी केली आहे. मिटकरी यांच्या या मागणीनंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात आमदार अमोल मिटकरी यांनी आज रावणाची महाआरती केली आहे. यावेळी आदिवासी समाज आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर गेल्यावर्षी आमदार अमोल मिटकरी यांनी सांगोळा गावातील रावण मंदिराचा जिर्णोद्धार करण्याची भूमिका मांडल्यानंतर देशभरात मोठा गदारोळ निर्माण झाला होता.
रावणाची पुजा दाक्षिणात्य राज्यात करीत असतात.परंतू आपल्या महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यात रावणाची मनोभावे पूजा आणि आरती झालेली पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. हे गाव आहे अकोल्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. पातूर तालूक्यातील सांगोळा नावाच्या या गावाच्या अगदी सुरूवातीलाच एका मंदिरवजा चौथऱ्यावर रावणाची एक अतिशय सुंदर, रेखीव मूर्ती आहे. सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा या मूर्तीला आहे.. येथील आदिवासी समाज रावणाची पूजा करीत आला आहे. रावणदहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी आदिवासी समाजाने केली आहे.
अमोल मिटकरी यांनी आज सांगोळ्यात रावणाची महाआरती केली. त्यांनी गेल्यावर्षी आपल्या आमदारनिधीतून 20 लाखांचा निधी मंदिराच्या सभागृह आणि जीर्णोद्धारासाठी दिला होता. यानंतर राज्य आणि देशभरात मोठा गदारोळ उडाला होता.यावर्षी मिटकरी यांनी सांगोळ्यात येऊन रावनदहनाच्या परंपरेवर देशभरात बंदीची मागणी केली आहे. आमदार मिटकरी यांच्या मागणीनंतर या विषयावरून पून्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहेत. राज्यात आदिवासी संघटनांचा रावणदहनाला विरोध आहे.
रावणाला जाळणारे रामासारखे पवित्र आहेत का? रावण हा ज्ञानी आणि सत्पुरूष होता. त्याच्यातील चांगुलपणावर समाजाचं दुर्लक्ष झाले आहे. रावणाने सीतेचं एका बापाच्या भूमिकेतून अपहरण करीत तिला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या वर्षी आपण रावण मंदिराच्या जिर्णोद्धाराचा निर्णय घेतल्यानंतर याचा आपल्याला राजकीय त्रास झाल्याने मला तो निर्णय मागे घ्यावा लागला. आता सामाजिक संघटनांच्या मदतीने मंदिराचा जिर्णोद्धाराचे प्रयत्न करू असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.