मोठी बातमी! मंत्रिमडंळ विस्तारानंतर शिवसेनेत वादाची ठिणगी, एकनाथ शिंदेंना पहिला धक्का

| Updated on: Dec 15, 2024 | 8:36 PM

आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मात्र या विस्तारामध्ये मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या काही आमदारांना संधी मिळू शकलेली नाही, त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

मोठी बातमी! मंत्रिमडंळ विस्तारानंतर शिवसेनेत वादाची ठिणगी, एकनाथ शिंदेंना पहिला धक्का
Follow us on

आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली, यामध्ये 33 कॅबिनेट मंत्र्यांचा तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपच्या 19 मंत्र्यांनी आज शपथ घेतली, तर शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या अनेक आमदारांना या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची संधी मिळू शकलेली नाहीये. मंत्रिपद हुकल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. याचा पहिला धक्का हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे.

पवनी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे मंत्रिपदासाठी इच्छूक होते. मात्र त्यांंचं मंत्रिपद हुकल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत शिववसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.  आजच्या मंत्रिमंडळात आपण पाहिलं तर अशा लोकांना मंत्रिपद मिळाले ज्यांचं पक्षात काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले भोंडेकर?  

आजच्या मंत्रिमंडळात आपण पाहिलं तर अशा लोकांना मंत्रिपद मिळाले ज्यांचं पक्षात काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही, अनेक आक्षेप व भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अशा लोकांनाही मंत्रिपद मिळालं. असे असताना आम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत, त्यामुळे त्याचं दुःख वाटतं. कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.  मी पूर्व विदर्भ समन्वयक व उपनेता असून जर मी जनतेला न्याय देउ शकत नसेल तर मी कशाला पदावर राहू, असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान सध्या मला कोणाचा फोन आला नाहीये.  सगळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात होते. ज्यांना पद मिळाले त्यांना शुभेच्छा आहेत. सध्या वेट अँड वॉचची भूमिका मी घेतली आहे. बऱ्याचशा गोष्टी माझ्या मनात आहेत. परंतु सध्या वेट अँड वॉचची भूमिका  घेतली आहे असंही यावेळी  भोंडेकर यांनी म्हटलं आहे.

प्रकाश सुर्वे यांची प्रतिक्रिया 

दरम्यान दुसरीकडे मंत्रिपदाची संधी हुकल्यानंतर प्रकाश सुर्वे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी नाराज नाही, पण संधी मिळाली असती तर त्याचं सोनं केलं असतं,संघर्ष माझ्या पाचवीला पुजला आहे, पण मी हार मानणारा नाही मी संघर्ष करतच राहणार असं सर्वे यांनी म्हटलं आहे.