MLA Rajendra Raut serious allegations : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सातत्याने झटणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सध्या आक्रमक पावित्रा घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते सातत्याने मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. सध्या बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे याच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आता राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर मोठा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
आमदार राजेंद्र राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राजेंद्र राऊत यांनी आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप केला आहे. “मनोज जरांगे पाटील यांच्या मागे रोहित पवारांचा हात आहे”, असा आरोप राजेंद्र राऊत म्हणाले.
“बार्शीतील तरुणांवर झालेल्या हल्ल्याबाबत मला कल्पना नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे रोहित पवारांचा हात आहे. मुळात जरांगे पाटील यांना देखील त्याची माहिती नाही, हे त्यांनी सांगितले. मला देखील त्याची माहिती नाही, मी माहिती घेतो. माझी मागणी आहे की ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत विशेष अधिवेशन घ्यावे, त्यात दूध का दूध, पाणी कां पाणी होईल?” असेही राजेंद्र राऊत यांनी म्हटले.
“जर अधिवेशन झाले नाही तर 23 सप्टेंबरपासून मी बार्शीत सकाळी 10 ते 5 या वेळेत ठिय्या आंदोलन करणार, असा इशाराही राजेंद्र राऊतांनी दिला. मनोज जरांगे आमचे घर जाळणार आहे की काय असे दिसते. त्यामुळे माझ्या जीवाला किंवा कुटुंबाला काही झाल्यास 120 ब प्रमाणे जरांगे पाटील त्याला दोषी असतील”, असेही राजेंद्र राऊत यांनी म्हटले.
दरम्यान आमदार राजेंद्र राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, ही प्रमुख मागणी मांडली आहे, अशी मागणी राजेंद्र राऊत यांनी पत्राद्वारे केली आहे. “काही जिल्ह्यांत तर ओबीसींना मराठ्यांशी बोलायचे नाही. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हायचे नाही. हॉटेल, पानटपरी, दुकान अशा ठिकाणी एकमेकांच्या दुकानात माल खरेदी करायचे नाही, असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. या प्रकारांमुळे मणीपूरसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते की काय, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे”, अशी मागणी राजेंद्र राऊतांनी केली आहे.