कोल्हापूर : कोल्हापूर म्हटलं की फक्त तांबडा-पांढरा (Tambda Pandhra), उसाचे फड, तालमी आणि गौरवशाली इतिहास (History) आणि आदर्श वारसा, कोल्हापुरातले राजकारणीही तसेच आहेत. याचं दर्शन आज पुन्हा घडून आलंय. तुम्ही आमदार ऋतुराज पाटलांचंच (Ruturaj Patil) घ्या की, एरवी इस्त्रीचे कपडे घालून, चकाचक गाडीत बसून, डोळ्याला चष्मा लावून फिरणारे ऋतुराज पाटील आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास भर पावसात धैर्यप्रसाद हॉल चौकात पोहोचले. मात्र जाताना त्यांना दिसलं दोन्ही बाजूला ट्रॅफिक, वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या. याठिकाणी गाडीही कोणी मागे घ्यायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे म्हटल्यावर ऋतुराज पाटलांना दम निघेना, त्यांनी उघडला गाडीचा दरवाजा आणि उतरले खाली, राहिले रस्त्याच्या मध्ये चौकात उभा. आता आमदार रस्त्याच्या मध्ये चौकात उभा राहिलाय म्हणल्यावर वाहन चालकांना जरा शिस्त आली. ऋतुराज पाटलांनी चौकात उभा राहून स्वतः ट्रॅफिक हवालदाराची जबाबदारी बजावत ट्रॅफिक हटवलं आणि मग गाडीत बसले गेले पुढे असे, त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
गोकुळची निवडणूक लागल्यावर आमच्या कोल्हापुरातल्या राजकारण्यांचा राडा तुम्ही अनेकदा पाहिलाय. तसेच आमचं ठरलंय, हे कोल्हापुरातलं वाक्य ही मागच्या निवडणुकीत महाराष्ट्रभर गाजलं. निवडणूक कुठलीही असू द्या कोल्हापूरसारखा माहोल कुठेच बनत नाही. मात्र निवडणूक संपली की तेच राजकारणी जनतेची काम चौकात उभे राहून करताना दिसतात. तेच कर्तव्य आज ऋतुराज पाटलांनी बजावलं आहे. त्यामुळे ऋतुराज पाटलांचा हा व्हिडिओ कोल्हापूरात वाऱ्यासारखा फिरतोय पोरांच्या कमेंट आणि लाईकचा पाऊस पडायला लागलाय.
तुम्ही कोल्हापूर पोटनिवडणुकीत बंटी पाटलांची फिल्डिंग बघितली असेल, त्या फिल्डिंगच्या जोरावर त्यांनी काँग्रेसचा उमेदवार सहज निवडून आणला. पण ही फिल्डिंग फक्त राजकारणातच नाही तर एक आमदार चौकात उभा राहून लावत वाहनांचा ट्रॅफिक हटवू शकतो, हीही ऋतुराज पाटलांनी आज महाराष्ट्रला दाखवून दिलं आहे. यावेळी काही कार्यकर्तेही त्यांच्या मदतीला उतरल्याचे दिसून आले.