विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. राज्यात 231 जागांसह महायुतीला मोठं यश मिळालं आहे. भाजप 131 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील मोठी मुसंडी मारल्याचं पहायला मिळत आहे. अजित पवार गटाला राज्यात 41 जागा मिळाल्या आहेत. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे राज्यात फक्त 45 जागा आल्या आहेत. ज्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सर्वाधिक 20 जागा, काँग्रेसच्या 15 जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्वात कमी 10 जागा आल्या आहेत.
मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव राहिल, त्याचा फटका हा महाविकास आघाडीला बसेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र मराठवाड्यात मतदारांनी देखील महायुतीच्याच बाजुनं कौल दिला आहे. मराठवाड्यात देखील महायुतीला मोठं यश मिळालं आहे. दरम्यान बीडमध्ये मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संदीप क्षीरसागर यांनी आपला गड राखण्यात यश मिळवलं आहे. विजय होताच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले आहेत.
नेमकं काय म्हणाले संदीप क्षीरसागर?
विजय होताच संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या विजयाचं श्रेय मनोज जरांगे पाटील यांना दिलं आहे. माझ्या विजयामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मोठा वाटा आहे. मी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. मी उद्या शरद पवार साहेब यांची देखील भेट घेणार आहे. मुस्लिम समाजाचे धर्मगुरू नेमानी यांची देखील मी मुंबईमध्ये भेट घेणार आहे. एकनिष्ठतेला किंमत देऊन पवार साहेबांनी मला उमेदवारी दिली. माझ्या विजयाचं श्रेय बीडच्या जनतेचं देखील आहे, असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.