मुंबईत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णांच्या रिपोर्ट कार्डच्या प्लेट्स बनवल्या आहेत. नाश्ता आणि इतर खाद्यपदार्थ देण्यासाठी या प्लेट्स बनवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं आहे. मुंबई महापालिका प्रशासन रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. या प्रकरणावरून विरोधक अधिकच आक्रमक झाले असून संबंधित अधिकाऱ्याला पालिकेतून हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेच्या रुग्णालयात विविध आजारांचे रुग्ण येत असतात. त्यांचे रिपोर्ट्स तयार केले जातात. त्यांच्या आजाराचा लेखाजोखा या रिपोर्ट कार्ड्समध्ये असतात. मात्र, महापालिकेने चक्क या रिपोर्ट्स कार्डसच्या खाद्यपदार्थांसाठी प्लेट्स बनवल्याने खळबळ उडाली आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे. किशोरी पेडणेकर यांनी ट्विट करत या रिपोर्ट्स कार्डच्या प्लेट्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर हे काय चाललंय? प्रशासन जागे व्हा…! एवढा अंधाधुदी कारभार करू नका, असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
रुग्णांचे रिपोर्ट कार्ड गोपनीय असतात. मात्र त्याचे पेपरचे प्लेट्स छापण्यात आले आहेत. यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेनंतर किशोरी पेडणेकर आणि श्रद्धा जाधव यांनी केईएम रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केली. त्यांच्यासोबत आमदार अजय चौधरीही उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रशासनाला या प्रकरणाबाबतचा जाब विचारला. ज्या लोकांना ऑफिसची माहिती नाही, त्यांना जबाबदारी नाही, अशा लोकांना घरी बसवलं पाहिजे. महापालिकेचं वाटोळं करू नका. मुंबईत अरेरावी खपवून घेणार नाही, असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला.
शिंदेंची हकालपट्टी करा
पालिकेचे अधिकारी सुधाकर शिंदे आल्यापासून मुंबईची वाट लावली आहे. आधी त्यांना हाकला. त्यांचं वय उलटून गेलं आहे. त्यांनाही वारंवार एक्स्टेनशन दिलं जात आहे. त्यांच्या मागे कोण आहे? कुणाच्या तरी आश्रयाने ते बसले आहेत. त्यांना आधी हद्दपार करा, अशी मागणी पेडणेकर यांनी केली.
हे काय चाललंय ??
प्रशासन जागे व्हा…!
एवढा अंधाधुनी कारभार करू नका @mybmc @mybmcHealthDept pic.twitter.com/6gUw6BSSGA— Kishori Pednekar (@KishoriPednekar) July 5, 2024
डीन प्रेशरखाली
डीन प्रेशरखाली आहे. त्या कोणतीही माहिती देत नाहीत. आम्ही सर्व माहिती काढली आहे. त्रुटी काय आहेत आणि कशाप्रकारची यंत्रणा राबवली जात आहे, हे आम्हाला माहीत आहे. स्टाफ तोंडातून शब्द काढत नाही. नर्सेसचं क्वॉर्टर तातडीने बांधण्यासाठी आमचे दोन वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. पण डीन ऐकत नाहीये, असा आरोप आमदार अजय चौधरी यांनी केला आहे.
पालिकेला भीक लागलीय का?
मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही या प्रकरणाला वाचा फोडली आहे. हे रिपोर्ट गोपीय असतात. कुठल्या तरी अधिकाऱ्याने अख्खे रिपोर्ट रद्दीत विकले आहेत. ते फक्त नातेवाईकांना द्यायला हवेत. हे रिपोर्ट रद्दीत विकायला महापालिकेला भीक लागली आहे का? हा चुकीचा प्रकार आहे. याची चौकशी झाली पाहिजे. आम्ही हॉस्पिटलला आणि आयुकतांना पत्र लिहिणार आहोत, असं संदीप देशपांडे म्हणाले.