मुंबई | 21 मार्च 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिल्लीवारी आणि अमित शाह यांच्या भेटीला दोन दिवस उलटून गेले आहेत. दिल्लीवारी झाल्यानंतर आज सकाळी राज ठाकरे महत्वाची बैठक घेणार आहेत. शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी 11 वाजता ही बैठक होणार असून या बैठकीला मनसे महत्वाचे नेत पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दिल्लीत नेमकं काय झालं, अमित शाह यांच्याशी काय चर्चा झाली, युतीबाबत काय निर्णय घेतला या सर्व विषयांवर आज चर्चा होणार असून युतीबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आज काय बोलतील, भाजपसोबत युतीचा निर्णय जाहीर करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्या दिवशी मनसेचा मेळावा असणार आहे. त्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होईल. या मेळाव्याच्या नियोजनाविषयीदेखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत काय घडलं?
दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंची दुसऱ्यांदा दिल्ली दौरा झाला. सोमवारी रात्री दिल्लीत पोहोचलेल्या राज ठाकरेंनी मंगळवारी, त्यांचा मुलगा अमित ठाकरे याच्यासह भाजप नेते अमित शाहांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चाही झाली. मनसे महायुतीत येण्याच्या चर्चांनी यामुळे जोर धरला. मात्र अमित शाहांची भेट झाल्यानंतर राज ठाकरे त्वरित मुंबईत परतले. ना त्यांनी ना भाजपा नेत्यांनी युतीबाबत कोणतेही भाष्य केले. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी वाट पाहण्याच सल्ला देत, योग्य वेळी सगळं जाहीर करू अशी प्रतिक्रिया दिली. मात्र यामुळे महायुती कशी असेल ? महायुतीत मनसेचं स्थान काय असेल ? मनसेला किती जागा सोडल्या जाणार ? असे अनेक प्रश्न लोकांच्या आणि मनसे नेत्यांच्या मनातही निर्माण झाले आहेत. त्या सर्व प्रश्नांची आज उत्तर मिळतली अशी अपेक्षा आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
राज ठाकरे महायुतीत कधी येणार ? ते किती आणि कोणत्या जागा लढवणार ? अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीचं नेमकं फलित काय ? असे प्रश्न सर्वांनाच पडले आहेत. हाच प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. राज ठाकरे आणि अमित शाह यांची भेट झाली आहे. मला असं वाटतं आत्ता या विषयावर काहीही प्री-मॅच्युअर बोलण्यापेक्षा एक-दोन दिवस वाट पाहा. लवकरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर काहीही स्पष्ट बोलणे टाळले.
मनसेला मुंबईतील जागा मिळणार ?
दरम्यान, राज ठाकरे यांची ताकद मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे राज ठाकरे महायुतीत आल्यास त्यांना मुंबईतील जागा सोडल्या जाऊ शकतात असा कयास लढविला जात आहे. याशिवाय राज ठाकरे यांना पुणे, ठाणे, नाशिक आणि औरंगाबादमध्येही जागा मिळतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पहिल्यांदाच युती
दरम्यान, राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढली. त्यांनी कोणत्याही पक्षाशी युती केली नाही. महापालिकेपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत राज यांची भूमिका एकला चालो रे राहिली आहे. मात्र, आता राज ठाकरे महायुतीत आल्यास त्यांच्या अलायन्सच्या राजकारणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे राज या महायुतीत येतात का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.