विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत ‘टीव्ही 9 मराठी’वर प्रसारीत झाली आहे. मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी घेतलेल्या या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. सध्या लाडकी बहीण योजना हा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. सत्ताधाऱ्यांकडून लाडक्या बहीण योजनेबाबत जोरदारपणे आपली भूमिका मांडली जात आहे, तर दुसरीकडे विरोधकांकडून मात्र या योजनेवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल सुरू आहे. दरम्यान आता यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
लाडकी बहीण योजना टिकली दर महिन्याला टिकवता आलं तर मी त्याला गिफ्ट म्हणेल. टिकवता आली नाही तर त्याला ब्राईब म्हणेल. मला इतर राजकारण्यांसारखं नाही वागता येणार. तशी अपेक्षा करणार असाल तर ते होणार नाही. चांगल्याला चांगलं म्हणणं वाईटाला वाईट म्हणणार. मला वाटतं प्रत्येकाने ही गोष्ट केली पाहिजे. याचा अर्थ भूमिका बदलत आहात असं होत नाही. स्वार्थासाठी केलं तर ती गोष्ट लागू होते. तुमचा स्वार्थ नसेल एखादी भूमिका पटली तर तुम्ही चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे. मुलगा उत्तम रितीने पास झाला तर कौतुक करता. नापास झाला तर ओरडता. मग त्याला घरातून हाकलून देता का? माझ्याबाबत काही गोष्टी समजून घ्या. बाकीच्यांच्या तराजूत मला तोलू नका, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, लाडकी बहिणीला विरोध नाही. यातून राज्याच्या तिजोरीवर भार नाही ना येत. राज्यावर कर्ज वाढणार नाही ना. आर्थिक दृष्ट्या या गोष्टी करेक्ट असतील तर पैसे द्या. गडकरींनीही या योजवर आक्षेप घेतला आहे. एखादी गोष्ट तुम्ही देताय ती देणं शक्य असेल तर करा. पण निवडणुकीच्या तोंडावर दोन महीने केली आणि उद्या नाही करता आली तर त्याला लाच म्हणावी लागेल. मेंटेन करता आली तर भेट म्हणावी लागेल. केंद्राकडून पैसे मिळतील तर आनंद आहे. महिलांना पैसे मिळू नये या विचाराचा मी नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.