पडद्यामागे जोरदार हालचाली, मनसेकडून शिंदे गटाला 10 जागांचा प्रस्ताव, मनोमिलन होणार?

| Updated on: Oct 28, 2024 | 6:35 PM

मनसेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 10 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मनसेचा हा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांना मान्य असेल का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

पडद्यामागे जोरदार हालचाली, मनसेकडून शिंदे गटाला 10 जागांचा प्रस्ताव, मनोमिलन होणार?
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचा प्रातिनिधिक फोटो
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक ही सत्ताधारी महायुतीसाठी जास्त प्रतिष्ठेची बनली आहे. कारण अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात जी उलथापालथ झाली त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडलेली. या निवडणुकीत महायुतीला अनेक ठिकाणी राज्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनसेला सोबत घेणं हे महायुतीचं आता कर्तव्य आहे. असं असलं तरी मनसेकडून जवळपास 110 मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली जात आहे. तर दुसरीकडे पडद्यामागे मनसेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 10 जागांचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. या सर्व जागांवर शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे या जागा मनसेसाठी सोडणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मनसेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 10 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामध्ये वरळी, शिवडी, माहिम, अंधेरी, जोगेश्वरी, दिडोशी, भांडुप, विक्रोळी, कल्याण यांचा समावेश आला आहे. वरळीत सध्या ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे विद्यमान आहेत. शिवडी मतदारसंघात ठाकरे गटाचे अजय चौधरी हे विद्यमान आमदार आहेत. इथे मनसेकडून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माहिममध्ये शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत. या जागेवर मनसेचे अमित ठाकरे हे पहिल्यांचा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

माहिम मतदारसंघात ट्विस्ट

माहिम विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण या मतदारसंघातून मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अमित ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आहेत. पण या मतदारसंघात शिवसेनेचे सदा सरवणकर हे गेल्या अनेक वर्षांपासून आमदार आहेत. त्यामुळे सदा सरवणकर हे आपला उमेदवारीचा दावा सोडण्यास तयार नाहीत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही दिग्गज नेत्यांनी सदा सरवणकर यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण आतापर्यंत त्यांना त्यात यश आलेलं नाही. या मतदारसंघात ठाकरे गटाकडूनदेखील उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पण सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घेतला तर माहिममध्ये ठाकरे गट विरुद्ध मनसे अशी थेट लढत बघायला मिळेल.

आदित्य ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला

दुसरीकडे मनसेकडून शिंदे गटाला देण्यात आलेल्या प्रस्तावात वरळी मतदारसंघाचादेखील समावेश आहे. या मतदारसंघात शिंदे गटाकडून राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मनसेकडून संदीप देशपांडे यांना संधी देण्यात आली आहे. तसेच ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार देखील आहेत. पण त्यांच्याविरोधात शिंदे गट आणि मनसेकडून दोन तुल्यबळ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरण्यात आल्याने आदित्य ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मनसेचा प्रस्ताव शिंदे गटाने स्वीकारल्यास या मतदारसंघात आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.