लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. पहिल्या टप्प्याचे अर्ज भरले जात आहेत. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या याद्या जाहीर होत आहेत. तोफा धडाडत आहेत. पण अशामध्ये मनसे कुठे आहे? मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुठे आहेत? राज ठाकरे आपले पत्ते का खोलत नाहीत? मध्यंतरी राज ठाकरे दिल्लीत जाऊन भाजप नेते अमित शाह यांना भेटले. त्यांच्याशी चर्चा झाली. नंतर मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी राज यांची चर्चा झाली. त्यानंतर राज ठाकरे पुन्हा राजकीय चर्चांमध्ये दिसले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांच्याबद्दलचा सस्पेन्स वाढलेला असतानाच मनसेचा गुढी पाडव्याचा टीझर लॉन्च झाला आहे. त्यातून एक सूचक विधान करण्यात आलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
कधी आहे मनसेचा गुढी पाडवा?
येत्या 9 एप्रिल रोजी मराठी नववर्ष दिन म्हणजे गुढी पाडवा आहे. संध्याकाळी 4 वाजता दादरच्या शिवाजी पार्कवर मनसेने गुढी पाडव्याचं आयोजन केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निमित्ताने राज ठाकरे शक्तीप्रदर्शनही करणार आहेत.
तोफ धडाडणार
मध्यंतरी राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांशी युतीची बोलणी केली. शिवाय पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी प्रत्यक्षपणे युतीच्या राजकारणाला सुरुवातही केली होती. अमित शाह यांच्या भेटीनंतर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यावेळी मनसेकडून युतीकडे तीन जागांची मागणी करण्यात आली होती, अशी चर्चा आहे. मात्र, त्यानंतर पुढे काहीच घडलं नाही. युतीच्या बैठकाही झाल्या नाहीत. राज ठाकरे यांनीही मीडियासमोर येऊन काहीच भाष्य केलं नाही. त्यामुळे दिल्लीत आणि मुंबईत काय घडलं याबाबत राज ठाकरे गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बोलण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या भाषणाकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरे 9 तारखेला कुणावर बरसतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, राज ठाकरे यांची भाजपवरील टीकेची धार कमी झालेली दिसेल. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर राज ठाकरे अधिक हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेही त्यांच्या भाषणाकडे लक्ष लागलं आहे.
निवडणूक लढण्या, न लढण्याबाबतची घोषणा करणार?
सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, राज ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. तसेच कार्यकर्त्यांकडूनही मतदारसंघात काम सुरू असल्याचं चित्र दिसत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांचा मनसे लोकसभा निवडणूक लढणार की नाही? याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे. त्याबाबतही राज ठाकरे या मेळाव्यातून मोठी घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर मनसेचं लोकसभेबाबतचं राज्यातील चित्र स्पष्ट होणार आहे. मनसे मैदानात उतरणार की भाजपला पाठिंबा देणार हेही याच दिवशी स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
टीझरमध्ये काय?
मनसेने गुढी पाडवा मेळाव्याचा टीझर लॉन्च केला आहे. त्यात राज ठाकरे यांचे भाषण करतानाचे व्हिज्युअल्स दाखवण्यात आले आहेत. तसेच मनसेच्या जुन्या गुढी पाडवा मेळाव्याची शिवाजी पार्कवरील गर्दीही यात दाखवण्यात आली आहे. राजकारणाची झाली दशा, राजविचार दाखवणार महाराष्ट्राला दिशा, असं या टीझरमध्ये म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रालाच नव्हे तर राजकारणालाही नवनिर्माणाची गरज असल्याचंही या टीझरमध्ये म्हटलं आहे. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, राज साहेब ठाकरे यांचा विजय असो या घोषणाही या टीझरमध्ये ऐकायला येत आहेत.