नाशिक : संपूर्ण देशभर कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने पायी चालत आहे. अनेक नागरिक त्यांना येऊन भेटत आहे. कन्याकुमारी येथून सुरू झालेली यात्रा महाराष्ट्रात सुरू आहे. आज शेगावमध्ये ही यात्रा पोहचणार असून तिथे राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, याच दरम्यान राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल पुरावे सादर करत विधान केले आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी पत्र दाखवत इंग्रजांची सावरकर यांनी माफी मागितली असल्याचे म्हंटलं आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या विधानाने खळबळ उडाली असतांना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवून निषेध करा असा आदेश मनसैनिकांना दिला होता, त्यानुसार ठिकठिकाणांहून मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते शेगावच्या दिशेने रवाना होत आहे. मुंबईवरुन नाशिक मार्गे जात शेगावला जात असतांना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
रात्री उशिरा 11 वाजेच्या दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्यासह नाशिकमधून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेगावच्या दिशेने रवाना होत आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावर राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी राज ठाकरेंनी दिलेला आदेश पाळणार असल्याचे मनसे नेत्यांनी म्हंटलं आहे.
यावेळी बोलतांना संदीप देशपांडे म्हणाले, स्वातंत्रवीर सावरकर यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, निषेध होणारच, मनसेचं आंदोलन कसं असतं सर्वाना माहिती आहे.
मुंबईवरून काही लोक निघाले आहे, काही नाशिकवरून आणि काही शेगावमध्ये पोहचले आहे, उपटसुंभ लोक महाराष्ट्रात येऊन बोलतात ते आम्ही सहन करणार नाही असं देशपांडे म्हणाले.
एकूणच राहुल गांधी यांचे नाव न घेता देशपांडे यांचा रोख राहुल गांधी यांच्यावर होता, देशपांडे यांनी वापरलेल्या शब्दावरून वाद होण्याची देखील शक्यता आहे.