‘दादू’ काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होता तेव्हा … राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसे आमदाराचा उद्धव ठाकरेंना सवाल

| Updated on: Jun 20, 2024 | 8:29 AM

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. षण्मुखानंद सभागृहात काल झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेताच निशाणा साधला. काही लोकांनी तर उद्धव ठाकरे नको म्हणून 'बिन शर्ट' पाठिंबा दिला, उघड पाठिंबा दिला असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

‘दादू’ काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होता तेव्हा ... राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसे आमदाराचा उद्धव ठाकरेंना सवाल
Follow us on

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. षण्मुखानंद सभागृहात काल झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेताच निशाणा साधला. काही लोकांनी तर उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिन शर्ट’ पाठिंबा दिला, उघड पाठिंबा दिला असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. मात्र त्यांची राज ठाकरेंवरील ही टीका मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना फारशी रुचलेली नाही. मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यामुळे आता शिवसेना वि. मनसे असं वाक् युद्ध रंगताना दिसू शकतं.

काय म्हणाले राजू पाटील ?

कंबरेचं काढून डोक्याला गुंडाळलेले ‘शर्त” आणि ‘शर्ट’ असले फुटकळ शब्दच्छल करतात. ‘दादू’ काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होतात तेव्हा काय काढलं होतंत ? असं ट्विट करत राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. एवढंच नव्हे तर लबाड लांडगं ढोंग करतंय असा हॅशटॅगही त्यांनी जोडला असून त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.

‘या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण दिसलं’ उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा

शिवसेना पक्षाचा काल 58 वा वर्धापन दिवस होता. या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईच्या षण्मुखानंद सभागृह येथे कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणात खोचक शब्दांत निशाणा साधला. “या निवडणुकीत आपलं कोण आणि परकं कोण हे दिसलं. काही लोकांनी तर उद्धव ठाकरे नको म्हणून बिन शर्ट पाठिंबा दिला. अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट. उघड पाठिंबा दिला. म्हणजे बिनशर्ट ना, बरोबर की चूक आहे”, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला होता. त्यामुळेच मनसेचे आमदार राजू पाटील भडकले असून त्यांनीही चोख प्रत्युत्तर देत टीका केली आहे.

.. तर मी आतंकवादी आहे

“काही संस्थांनी लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला. काही युट्युबरनेही प्रचार केला. मिंधे बोलले शहरी नक्षलवाद. हुकूमशाही तोडाफोडा आणि लोकशाही वाचवा हा प्रचार नक्षलवाद वाटतो.लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे. संविधान वाचवणं हा आतंकवाद असेलतर मी आतंकवादी आहे. पण तुमचे बापजादे दिल्लीत बसले आहेत. मोदी शहा जे सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत आहे. कार्यकर्त्यांच्या घरी ईडी सीबीआयला पाठवता. अमोलला पाडणारा गद्दार निर्लज्जपणे सांगतो माझ्याकडे पर्यायच नव्हता. नाही तर तुरुंगात गेलो असतो. तुम्ही दमदाट्या देऊन तुरुंगात टाकता, दहशत निर्माण करता हा तुमचा नक्षलवाद नाही का. हा तुमचा सरकारी नक्षलवाद नाही का. हा नक्षलवादच आहे. सत्तेचा दुरुपयोग करणं हा शहरी नक्षलवादापेक्षा भयानक आहे. लोकशाहीची हत्या करण्यासारखं आहे. तुम्ही खरे नक्षलवादी आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.