मनसेचा एकमेव आमदार होणार खासदार? शिंदे गटाला देणार धक्का?

| Updated on: Sep 27, 2023 | 8:09 PM

आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे, मनसेने त्या दृष्टीने तयारी सुरु केलीय. बाळा नांदगावकर यांनी दक्षिण मुमाबीतून निवडणूक लढण्याची तयारी केल्याची बातमी समोर येत आहे. आता मनसेचा एकमेव आमदारही लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे.

मनसेचा एकमेव आमदार होणार खासदार? शिंदे गटाला देणार धक्का?
RAJ THACKAREY, CM EKNATH SHINDE AND SHRIKANT SHINDE
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

उल्हासनगर : 27 सप्टेंबर 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. तर, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री शिंदे यांनी या भेटीदरम्यान राज ठाकरे यांना गणपतीची मूर्ती भेट म्हणून दिली. मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होत आहेत. तर, इकडे मनसे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे याचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधातच दंड थोपटलेत. मनसेच्या एकमेव आमदाराचे भावी खासदार असे पोस्टर्स, बॅनर झळकावत शिंदे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय.

मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी मनसे पदाधिकारी यांना वाढदिवसानिमित्त बॅनरवर खर्च करू नका, शहरातील खड्डे भरा असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उल्हासनगरमध्ये रस्त्यावर असलेले खड्डे भरून वाढदिवस साजरा केला.

उल्हासनगरमधील महाराष्ट्र मनसे कामगार सेनेने कॅम्प ३ मधील फॉरवर लाईनमधील रस्त्यावरील खड्डे भरून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे नागरिकांमध्ये पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविषयी प्रंचड नाराजी पसरली आहे. त्याची ही नाराजी लक्षात घेऊन आमदार राजू पाटील यांचा वाढदिवस चक्क खड्डे भरून साजरा करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

काही गाड्यांमधून रस्त्यावर भरण्यासाठी आणण्यात आली. या गाड्यांवर राजू पाटील यांचे भावी खासदार असे बॅनर लावण्यात आले होते. अशाच पद्धतीचे बॅनर शहरात काही ठिकाणी लावण्यात आले होते. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदार संघात मनसे आपला खासदारकीचा उमेदवार देणार की काय अशी राजकीय चर्चा रंगू लागलीय.

विशेष म्हणजे कल्याण- डोंबिवली या लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे करत आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्यासमोर राजू पाटील यांना उमेदवारी देऊन राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन देणार का? अशी चर्चा सुरु झालीय.

मुंबईतही मनसे सरचिटणीस बाळा नांदगावकर यांनी गणेशोत्सवानिमित दादर, माहीम परिसरात जोरदार बॅनरबाजी केली होती. त्यामुळे दक्षिण मुंबई मधून नांदगावकर लोकसभा निवडणुका लढविणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. इथेही शिंदे गटाचे राहुल शेवाळे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे मनसे आगामी काळात शिंदे गटाला धक्का देणार का? याची उत्सुकता आहे.