Raj Thackeray Big Allegation On Sharad Pawar : “आपल्या महापुरुषांना कधी जातीत पाहिलं नाही. संताना आडनावाने किंवा जातीने पाहिलं गेलं नाही. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर या गोष्टी सुरू झाल्या. असा महाराष्ट्र कधीच नव्हता”, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. यावेळी राज ठाकरेंनी राष्ट्रवादी पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही टीका केली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहे. आज राज ठाकरे हे अमरावती नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला.
“लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान हे अँटी मोदी आणि अँटी शाह होतं. ठाकरे आणि पवारांच्या प्रेमासाठी मतदान केलं नाही. संविधान बदलण्याच्या कारणामुळे दलितांनी एकगठ्ठा मतदान केलं. त्यांनी पाच वर्षात गलिच्छ राजकारण झालं. लोक या राजकारण्यांना स्वीकारणार नाही. मतदार ही गोष्ट विसरलेले नाहीत. ते विधानसभेत त्याचा राग काढतील. मी फिरतोय, वाचतोय आणि ऐकतोय त्यातून मला जे दिसलं ते मी सांगितलं”, असे राज ठाकरे म्हणाले.
“पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवाद अधिक वाढला. पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण झालं. या सर्व गोष्टींना शरद पवार कारणीभूत आहेत,. त्यांनी ही सुरुवात केली. पुलोद स्थापन झाल्यापासून ही गोष्ट सुरू आहे. शरद पवार यांनी 1991 ला शिवसेनेचे आमदार फोडले. भुजबळ वगैरे फोडले. त्यानंतर अनेक लोकांना फोडलं. गणेश नाईकांना फोडलं. राणे गेले. हे सर्व राजकारण शरद पवार यांनी सुरू केलं. जातीचं विषही शरद पवार यांनीच कालवलं”, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला.
“1991 ला राष्ट्रवादी स्थापन झाली. त्यानंतर आणि त्यापूर्वीचा महाराष्ट्र पाहा. आपल्या महापुरुषांना कधी जातीत पाहिलं नाही. संताना आडनावाने किंवा जातीने पाहिलं गेलं नाही. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर या गोष्टी सुरू झाल्या. असा महाराष्ट्र कधीच नव्हता. 1990 नंतर हा जातीयवाद सुरू झाला. हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे. हा विषय लोकसभा किंवा विधानसभेसाठीचा नाही. हा घराघरात गेलेला विषय आहे”, असे राज ठाकरे म्हणाले.