राज ठाकरे यांचं आजचं भाषण कसं असेल? गलिच्छ राजकारण, अणूबॉम्ब… संदीप देशपांडे काय म्हणाले?

| Updated on: Mar 22, 2023 | 12:00 PM

गुढीपाडव्यानिमित्त आज अवघ्या महाराष्ट्राला राज ठाकरे यांच्या भाषणाची उत्सुकता आहे. दादर येथे यासाठी मनसेतर्फे भव्य सभेची तयारी करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांचं आजचं भाषण कसं असेल? गलिच्छ राजकारण, अणूबॉम्ब... संदीप देशपांडे काय म्हणाले?
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, आगामी लोकसभा (Loksabha) आणि विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची तगडी रणनीती आणि नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप या वातावरणात आज राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गुढी पाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे. राज ठाकरेंची तोफ नेमकी कोणाच्या दिशेने धडाडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्यांच्या भाषणात नेमके कोणते मुद्दे असतील, या अनुषंगाने आडाखे बांधले जात आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहेत. ते म्हणाले, अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे, तशी मलाही राज ठाकरेंच्या भाषणाची प्रतीक्षा आहे. मात्र सध्याच्या गलिच्छ राजकारणावर तुरटी फिरवण्याचं काम या भाषणातून केलं जाईल, अशी शक्यता आहे.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

संदीप देशपांडे म्हणाले, गुढी पाडव्याला राज ठाकरे नेहमीच एक नवा संदेश घेऊन येतात. सध्या ज्या पद्धतीचं गलिच्छ दर्जाचं राजकारण चाललंय, त्यावर तुरटी फिरवण्याचा काम राज ठाकरेंकडून केलं जाईल, असं वाटतंय. आजचं भाषण म्हणजे अणू बॉम्ब असणार आहे, त्याचे हादरे संपूर्ण महाराष्ट्राला बसतील. राज ठाकरे यांची सभा नेहमीच रेकॉर्ड ब्रेक असतात. त्यांच्याच सभेचा रेकॉर्ड ते मोडत असतात. बाकी कुणालाही ते मोडता येत नाहीत, असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलंय.

भावी मुख्यमंत्री बॅनरबाजी…

राज ठाकरे यांच्या सभेसाठी दादर आणि शिवाजी पार्क परिसरात जय्यत तयारी केली जात आहे. दादरमधील शिवसेना भवनासमोर राज ठाकरे यांचे भले मोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री, हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे, असा उल्लेख या बॅनर्सवर करण्यात आलाय. मनसेच्या माहिम विधानसभा शाखेच्या वतीने हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. भगवी शाल पांघरलेला राज ठाकरे यांचा भव्य फोटो या बॅनर्सवर छापण्यात आला आहे. त्याखाली लक्ष्मण पाटील यांचा फोटो आहे. ते मनसेचे उपशाखाध्यक्ष आहेत.

राजकीय चर्चांना उधाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बॅनर्सवर भावी मुख्यमंत्री असे संबोधल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून राज ठाकरेंचं नाव चर्चेत येऊ शकतं का, अशीही चर्चा होऊ लागलीय. संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. देशात लोकशाही आहे. कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. बहुमत असेल तर होतीलही. पण बहुमत ही चंचल गोष्ट असते. आज आमच्याकडे असेल तर उद्या दुसऱ्या कुणाकडे असेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.