मुंबई: दादरच्या शिवसेना भवनासमोर (shivsena bhavan) हनुमान चालिसा (hanuman chalisa) सुरू केल्याने शिवाजी पार्क पोलिसांनी मनसेचे (mns) पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांच्यासह मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मनसेच्या रथावरील भोंगेही जप्त केले आहेत. त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन पोलीस ठाण्याखालील मंदिराजवळ हनुमान चालिसा आणि मारुती स्त्रोत्रचे पठण सुरू केले आहे. मनसेच्या या अनोख्या आंदोलनामुळे पोलीसही हैरान झाले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी का अटक केली हे माहीत नाही. शिवसेना भवन हे काही मुस्लिमांचं स्थळ नाही. हिंदुत्ववाद्यांचं कार्यालय आहे. त्यामुळे तिथे हनुमान चालिसा म्हटलं तर बिघडलं कुठं? असा सवाल मनसेने केला आहे. जोपर्यंत आमच्या सहकाऱ्यांना सोडलं जात नाही, तोपर्यंत आमचं हनुमान चालिसा पठण सुरूच राहील असा इशाराही मनसेने दिला आहे.
शिवसेना भवनासमोर एका रथातून हनुमान चालिसा लावल्याप्रकरणी पोलिसांनी यशवंत किल्लेदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं. ही माहिती कळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. बघता बघता पन्नास एक कार्यकर्ते शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जमले. या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या खाली असलेल्या मंदिरात ठाण मांडून हनुमान चालिसा म्हणण्यास सुरुवात केली आहे. सर्व कार्यकर्ते मंदिरात मांडी घालून बसले असून त्यांनी डोळे मिटत हातजोडून हनुमान चालिसा म्हणण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी मनसेचे नेते संदीप देशपांडेही उपस्थित आहेत.
आमच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई कशासाठी केलीय ते माहीत नाही. त्यांना पोलीस ठाण्यात का आणलं हे सुद्धा पोलिसांनी सांगितलं नाही. पण आज रामनवमी आहे. त्यामुळे हनुमान चालिसा आणि मारुती स्त्रोताचे पठण करतोय. देवाची भक्ती करतोय. हा निषेध नाही. आम्ही आमच्या देवाची भक्ती करतोय. कुणाला निषेध वाटत असेल तर त्याला आमचा इलाज नाही, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
शिवसेना भवन ही काही मस्जिद नाही, ज्याच्या समोर हनुमान चालीसा लावली म्हणून कारवाई केली. शिवसेना भवन हे हिंदूच पवित्र स्थळ आहे. मग कारवाई का ? हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र मुख्यमंत्री असताना अश्या पद्धतीने कारवाई होतेय हे दुर्दैव आहे. ज्या टॅक्सी वर स्पीकर लावण्यात आले होते, ती टॅक्सी विभागात फिरवण्यात येणार होती. राम नवमी निमित्त हनुमान चालीसा लावणे गुन्हा आहे का? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.
संबंधित बातम्या:
Sanjay Raut: महाराष्ट्रातील एका नेत्याच्या इशाऱ्यावर ईडीच्या कारवाया; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप