पहिल्यांदाच ड्रोन, लायडारद्वारे झोपडपट्टीचं सर्व्हेक्षण; धारावीत झाला प्रयोग

| Updated on: Dec 03, 2024 | 2:28 PM

धारावी पुनर्विकास प्रकल्पात आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचे सर्वेक्षणासाठी ड्रोन, लायडार आणि मोबाईल ॲप्सचा वापर केला जात आहे. यामुळे अचूक, पारदर्शक आणि कार्यक्षम डेटा संकलन होत आहे. "डिजिटल ट्विन" तयार करून माहितीचे विश्लेषण सोपे झाले आहे. रहिवाशांना माहिती देण्यासाठी IEC कार्यक्रम राबवले जात आहेत. हा प्रकल्प भारतातील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी एक आदर्श ठरेल.

पहिल्यांदाच ड्रोन, लायडारद्वारे झोपडपट्टीचं सर्व्हेक्षण; धारावीत झाला प्रयोग
धारावी
Follow us on

भारतातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये पहिल्यांदाच धारावी पुनर्विकास प्रकल्पात (DRP) आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचे सर्वेक्षण व नोंदणी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी अचूक, पारदर्शक आणि कार्यक्षमपणे होणे हाच या तंत्रज्ञानाच्या वापराचा उद्देश आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) प्रकल्पांचे सर्वेक्षण हे टोटल स्टेशन सर्व्हे आणि दस्तऐवजांची पडताळणी यांसारख्या पद्धतींवर अवलंबून होते. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा भारतातील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणारा धारावी हा पहिला पुनर्वसन प्रकल्प आहे.

मात्र, धारावी पुनर्विकास प्रकल्पात ड्रोन, लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग (लायडार ) तंत्रज्ञान आणि मोबाईल ऍप्लिकेशन्सचा वापर करून माहिती डिजिटल पद्धतीने गोळा करण्यात येते आणि नंतर तिचे विश्लेषण केले जाते. यामुळे धारावीचे “डिजिटल ट्विन” प्रारूप तयार होत आहे. म्हणजेच धारावीचे आभासी प्रतिरूप, जे माहितीचे सखोल विश्लेषण करण्यासाठी व निर्णय प्रक्रिया सुयोग्य करण्यासाठी उपयोगी पडणार आहे,” अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी (DRP-SRA) संबंधित अधिकाऱ्याने दिली.

रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानावर आधारित ‘लायडार’

‘लायडार’ हे रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानावर आधारलेले आहे. वेगाने भू-स्थानिक डेटा गोळा करण्यासाठी हे ओळखले जाते. यात लेसर लाईटद्वारे अंतर मोजले जाते आणि भूभाग, इमारती आणि वस्तूंचे अचूक 3D प्रतिरूप तयार करण्यात येते. धारावीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये फिरण्यासाठी सध्या पोर्टेबल लिडार प्रणाली वापरली जात आहे. ड्रोनद्वारे आकाशातून दृश्यं टिपली जात आहेत. ज्यामुळे धारावीचे नकाशे तयार करणे आणि नियोजन सोपे होते. त्याचबरोबर, घरोघरी जाऊन डेटा गोळा करण्यासाठी मोबाईल ॲप्सचावापर केला जात आहे. या ॲप्समुळे माहितीची अचूकता वाढत असून त्यामध्ये कोणतीही त्रुटी राहणे किंवा डेटा गमावण्याची शक्यता कमी झाली आहे.

डिजिटल मॉडेल ठरणार प्रभावी 

“डिजिटल ट्विन” म्हणजे धारावीचे आभासी प्रतिरूप असून ते या प्रकल्पातील विविध टप्प्यांवर डेटा गोळा करून त्याच्या विश्लेषणाची प्रक्रिया सोपी करत आहे, अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी (DRP-SRA) संबंधित अधिकाऱ्याने दिली. त्यांच्या मते, रहिवाशांची निवासी पात्रता ठरवताना आणि वाद मिटवण्यासाठी हे डिजिटल मॉडेल प्रभावी ठरणार आहे. मात्र, ही आधुनिक सर्वेक्षणाची प्रक्रिया आव्हानात्मक आहे.

कारण, धारावीतील काही रहिवाशांना फसवणूक किंवा डेटा दुरुपयोगाची भीती वाटत आहे. त्यामुळे DRP-SRA टीमकडून व्यापक माहिती, शिक्षण, आणि संवाद कार्यक्रम (IEC) सध्या राबवले जात आहेत. यामध्ये रहिवाशांसोबत बैठका घेणे, पत्रके वाटणे, कॉल सेंटरद्वारे माहिती देणे, रहिवाशांना सर्व्हे प्रक्रियेची सविस्तर माहिती देणे या सर्व बाबींचा समावेश आहे. ही सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी DRP – SRA चे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. तर फील्ड सुपरवायझर्स हे धारावीतील रहिवाशांना योग्य कागदपत्रे पोहोचवण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.

सर्व कागदपत्रे सादर झाल्यानंतर, रहिवाशांना DRP-SRA अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह एक पावती दिली जाते आणि पुढील टप्प्यांची देखील माहिती दिली जाते. ज्या रहिवाशांकडे त्या वेळी कागदपत्रे उपलब्ध नसतात, त्यांना ती जमा करण्यासाठीचे मार्गदर्शन केले जाते. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा भारतातील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणारा धारावी हा पहिला पुनर्वसन प्रकल्प आहे. या पद्धतीमुळे प्रकल्प अधिक कार्यक्षम, अचूक आणि पारदर्शक होत असून भविष्यातील पुनर्वसन प्रकल्पांसाठी एक नवीन दिशा देण्याचे या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे.