कल्याण : 18 व्या लोकसभेसाठी लोकसभा 2024 च्या सर्वसाधारण निवडणूकांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणूकांचे चार टप्पे पार पडले आहेत. चौथा टप्प्यात महाराष्ट्रात 11 लोकसभा जागांवर मतदान झाले. नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी, बीड अशा मतदार संघासाठी मतदान आहे. आता लोकसभा निवडणूकांचा मुंबई आणि ठाणे या दोन्ही शिवसेनेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मतदार संघात निवडणूका होत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात सभा ठेवण्यात आली आहे. आज बुधवारी 15 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण पश्चिमेत येत आहेत. त्यासाठी वाहतूक विभागाने वाहतूक मार्गात अनेक बदल केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज बुधवारी 15 मे रोजी कल्याण पश्चिमेत जाहीर सभा होत आहे. या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरुन अतिमहत्वाच्या व्यक्ती येत असल्याने प्रोटोकॉल पाळला जाणार आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीन सभास्थळी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सभा होणाऱ्या ठिकाणाच्या परिसरामध्ये वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ठाणे शहर पोलीस उप आयुक्तांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे कल्याणकरांना घरातून बाहेर पडताना वाहतूकीतील बदल जाणून घेऊन त्याप्रमाणे नियोजन करावे अशी विनंती पोलिसांनी केलेली आहे.
ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनुक्रमे नरेश म्हस्के, कपिल पाटील आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कल्याणमध्ये येत आहेत. कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स मैदानावर ही जाहीर सभा होणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी आधारवाडी परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या जाहीर सभेसाठी सुमारे 1 लाखांच्या आसपास नागरिक येण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सभास्थळाच्या आसपासच्या परिसरातील वाहतुकीत वाहतूक पोलिसांकडून मोठे बदल करण्यात आले आहेत. मंगळवारी रात्रीपासूनच रात्री 12 वाजल्यापासून उद्या बुधवारी सभा संपेपर्यंत हे बदल लागू असणार आहेत.
1 ) आधारवाडी चौक सिग्नल ते गांधारी ब्रिजपर्यंत बापगाव संपूर्ण रस्ता आणि या रस्त्याला मिळणारा आतील रस्ता ( कट ) येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
नागरीकांनी आपली वाहने वाडेघर सर्कल वाडेघर गाव, काशी दर्शन बिल्डींगकडून ( साईकृपा ऑटो गॅरेज ) उजव्या बाजूस वळण घेऊन निलकंठ सृष्टी सोसायटीच्या डाव्या बाजूने मार्गस्थ होऊन रोनक सिटी मार्गे साई सत्यम बिल्डींग, मुथा कॉलेज, वेदांत हॉस्पिटल मार्गे इच्छित स्थळी न्यावीत
2 ) गांधारी चौक ते भट्टी चाय ( सनसेट ) संपूर्ण रस्त्यावर सर्वसामान्यांच्या वाहनांसाठी ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे.
नागरीकांनी आपली वाहने भट्टी चाय ( सनसेट ) थारवानी बिल्डींगकडून उजव्या बाजूने झुलेलाल चौक येथून डावे वळण घेऊन गोदरेज हिल बारावे गाव मार्गे इच्छित स्थळी न्यावीत
3 ) रूतू बिल्डींगकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन सर्वसामान्यांच्या वाहनांसाठी ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे.
नागरीकांनी आपली वाहने रूतू बिल्डींगकडून वेदांत हॉस्पिटल, मुथा कॉलेज पाण्याच्या टाकी जवळून पुढे इच्छित न्यावीत
4 ) डी मार्टकडून अग्रवाल कॉलेज मातोश्री हॉस्पिटलकडे येणाऱ्या वाहनांना ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे.
नागरीकांनी आपली वाहने डी मार्ट ते वसंत व्हॅली वायलेनगर मार्गे इच्छित स्थळी न्यावीत
5 ) महाराजा अग्रसेन चौकाकडून हिना गार्डन, तुलसीपुजा चौक, कस्तुरी पार्क, गणपती चौककडे जाणाऱ्या वाहनांना ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे.
नागरीकांनी आपली वाहने महाराजा अग्रसेन चौककडून डावीकडे वळवून वायलेनगर येथून खडकपाडा ते दुर्गाडी अशा मुख्य वाहिनीवरुन इच्छित स्थळी न्यावीत
6 ) डी. बी. चौक ते गणपती चौक, निक्कीनगर मार्ग सर्वसामान्यांच्या वाहनांसाठी ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे.
नागरीकांनी आपली वाहने डी. बी. चौक ते ओम रेसीडन्सी समोरून डावे बाजूस वळवून निलकंठ सृष्टी सोसायटीच्या उजव्या बाजूने काशी दर्शन बिल्डींग समोरून डाव्या बाजूकडे वाडेघर गाव वाडेघर सर्कल मार्गे इच्छित स्थळी न्यावीत
7 ) आधारवाडी सिग्नल चौक ते आधारवाडी जेल, डी बी चौक रस्ता वाहनांस ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
ही वाहने वाडेघर सर्कल हनुमान मंदीर, वाडेघर, काशी दर्शन बिल्डींग, समर्थ कृपा अॅटो गॅरेज कडून उजवे बाजूस निलकंठ सृष्टीच्या डावे बाजूने वळण घेवून ओम रेसीडन्सी समोरून पुढे इच्छित स्थळी जातील.
8 ) वायलेनगर पोलीस चौकीकडून आधारवाडी जेल रोड कडे जाणाऱ्या वाहनांना ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
ही वाहने वायलेनगर पोलीस चौकी ते वायलेनगर चौक येथून मेन दुर्गाडी ते खडकपाडा मुख्य वाहिनी मार्गे इच्छित स्थळी जातील.