मुंबई : सरसंघचालक (RSS) मोहन भागवत यांनी भारतीय लोकांच्या डीएनएबाबत महत्वाचं विधान केलं आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीचा डीएनए हिंदूच असल्याचं मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले आहेत. आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारे देवाची पूजा, भक्ती केली जाते. ती कुणी बदलण्याची गरज नाही. कारण कोणत्याही माध्यमातून केलेली प्रार्थना एकाच ठिकाणी जाते, असंही भागवत (Mohan Bhagwat) म्हणालेत.
40 हजार वर्षांआधीपासून अखंड भारताचा डीएनए एकच आहे. काबूलच्या पश्चिमेपासून ते छिन्दविन नदीच्या पूर्वेपर्यंत तिबेटच्या उत्तरेपासून म्हणजेच चीनपासून ते श्रीलंकेच्या दक्षिणेपर्यंतच्या प्रदेशात जे लोक राहतात. त्या सर्व लोकांचा डीएनए 40 हजार वर्षांपासून एकच आहे. तो म्हणजे हिंदू, असं भागवत म्हणालेत.
40 हजार वर्षांपासून आपल्या साऱ्याचे पूर्वज एकच आहेत, असंही मोहन भागवतांनी म्हटलं आहे.
छत्तीसगडमधील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलंय.छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूरमध्ये आयोजित स्वयंसेवकांच्या कार्यक्रमात हे बोलत होते.
विविधतेत एकता हीच भारताची ओळख आहे. भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे, असं आम्ही 1925 सालापासून सांगत आहोत, असंही भागवतांनी यावेळी सांगतलं.
आपली संस्कृती सर्वांना पुढे घेऊन जाणारी आहे. आपण आपआपसात भांडू पण संकटाच्यावेळी मात्र आपण एकत्र येतो. सगळेजण एकत्र येत संकटाशी सामना करतो. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आता नुकतंच आलेल्या कोरोना संकटकाळात आपण सगळ्यांनी एकत्र येत परिस्थितीशी दोन हात केले. आपण कालही एक होतो आजही आहोत, असं भागवत म्हणालेत.