मुंबई : समीर वानखेडे (Sameer Wankhede) प्रकरणात नवाब मलिकांवर (Nawab Malik) गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचा दावा भाजपच्या मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केला आहे. नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्टने नवाब मलिकांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिल्याचा दावा कंबोज यांनी केला आहे. समीर वानखेडे यांच्यावर खोटे आरोप केल्याचा ठपका ठेवत मलिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याचा दावा कंबोज यांच्याकडून करण्यात आला आहे. नवाब मलिक यांना हा मोठा दणका असल्याचेही कंबोज म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसात वानखेडे विरुद्ध नवाब मलिक हा वाद संपूर्ण देशाने पाहिला आहे. वानखेडे हे भाजपच्या इशाऱ्यावर राज्यात कारवाया करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आला होता, तर मी माझं कामं करतोय असं वारंवार समीर वानखेडे सांगत होते.
मोहित कंबोज यांचं ट्विट
The National Commission for Scheduled Castes #Delhi has passed an order asking the #MumbaiPolice to register an FIR against NCP leader #NawabMalik .
This is Just Beginning !
— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) January 31, 2022
नवाब मलिक यांचे वानखेडे यांच्यावर आरोप काय?
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे खोटे जात प्रमाणपत्र दाखवून भरती झाले आहेत. असा आरोप नवाब मलिक यांच्याकडून वारंवर करण्यात येत होता. तसेच वानखेडे मुस्लिम असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांनी बदल्याच्या भावनेतून नवाब मलिक यांच्या जावयावर कारवाई केली होती, असा आरोपही वानखेडेंवर झाला आहे. तसेच वानखेडे यांना गांजा आणि तंबाकू यातला फरकही कळत नाही, असेही नवाब मलिक म्हणाले होते. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक हे सध्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकात जोर लावत आहे. भाजपवर टीका करण्यात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक नेहमी आघाडीवर असतात. त्यामुळेच भाजप नेत्यांच्या ते टार्गेटवर असतात. आता मोहित कंबोज यांनी हा दावा केल्याने पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
वानखेडेंचा दावा काय?
माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे हिंदू आहेत तर आई जहिदा मुस्लिम होती. आमचे धर्मनिरपेक्ष कुटुंब असून मला त्याचा अभिमान आहे. मी डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी 2006 मध्ये लग्न केलं आणि 2016 मध्ये आमचा परस्पर संमतीने घटस्फोट झाला, अशी माहिती त्यावेळी वानखेडे यांनी दिली होती.