मुंबई | 18 जुलै 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्र्यांना सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही आज सभागृहात अनेक मंत्री अनुपस्थित होते. NDA च्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दुपारी दिल्लीला निघाले. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात उपस्थिती लावली. याच दरम्यान विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप नेते किरीट सोमैया यांच्या ‘त्या’ तथाकथित क्लीपवरून सभागृहात प्रश्न उपस्थित केला.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान परिषद सभागृहात पोहोचले. त्यांच्यापाठोपाठ काही मंत्रीही गेले. नेमकी हीच संधी साधून विधानसभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
प्रश्नोत्तराच्या तासापासून लक्षवेधी सुचनापर्यत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री समाधानकारक उत्तर देत नाहीत. उपमुख्यमंत्री सर्व उत्तर देत आहेत. आमदार अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर प्रश्नांना सभागृहात वाचा फोडतात. पण, मंत्री या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाहीत. सभागृहात येताना ते कोणतीही तयारी करून येत नाहीत, माहिती घेऊन येत नाहीत अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
कोणताही मंत्री समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही. उत्तरासाठी उपमुख्यमंत्र्यांना उभे राहावे लागते हे सभागृहाला शोभत नाही. विधानसभा अध्यक्षांनी मंत्र्यांना सक्त ताकीद द्यावी अशी मागणी थोरात यांनी यावेळी केली.
सत्तारुढ पक्षाने 293 अन्वये शेतीसंदर्भातील प्रस्ताव मांडला होता. तब्बल दहा विषय एकत्रित करून हा प्रस्ताव मांडला होता. यात जलसंपदा, जलसंधारण, उर्जा, दुग्धविकास आदी दहा खात्यांचा विषय त्या विभागाशी संबंधित काही मंत्री सभागृहात हजर नव्हते यावरून बाळासाहेब थोरात यांनी सरकारला धारेवर धरले.
सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावात 25 ते 30 योजनांची नावे आहेत. सुंदर नावं दिली आहेत पण अंमलबजावणी होत नाही. एका योजनेचे तर ‘एक दिवस बळीराजासाठी’ असे नाव आहे. पण, प्रत्यक्षात ‘एक दिवस बळीराजा’साठी आणि बाकीचे दिवस आमदार फोडण्यासाठी आहेत का? असा खरमरीत टोला त्यांनी लगावला.