नागपूर : यंदा राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी (Heavy Rain) झाल्याचं पहायला मिळालं; जून आणि जुलै महिन्यात राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका हा विदर्भाला (Vidarbha) बसला आहे. विदर्भात पावसाने 29 वर्षांचे रेकॉर्ड तोडले आहे. यंदा विदर्भात सरासरीच्या तब्बल 34 टक्के अधिक पाऊस झाल्याची माहिती नागपूर हवामान विभागाच्या (Meteorology Department) वतीने देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात सरासरीच्या 60 टक्के अधिक पाऊस पडला आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त 1446 मीमी पावसाची नोंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यात सरासरीपेक्षा 63 टक्के अधिक पाऊस झाला आहे. एक जूनपासून ते आतापर्यंत विदर्भातील 11 जिल्ह्यांपैकी तब्बल 9 जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची माहिती नागपूर हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. तर अनेकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली.
यंदा विदर्भात विक्रमी पाऊस झाला. पावसाने गेल्या 29 वर्षांचे रेकॉर्ड तोडले. मात्र या पावसाचा मोठा फटका हा विदर्भातील शेतकऱ्यांना बसला आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांपैकी 9 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने ओला दुष्काळा सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. पिक पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. जून, जुलैनंतर पावसाने ऑगस्टच्या सुरुवातीला विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा 9 ऑगस्टपासून विदर्भात पावसाला सुरुवात झाली अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका हा गडचिरोली. चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांना बसला आहे. अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली. तसेच पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे.
विदर्भातच नाही तर राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. मात्र यंदा मराठवाड्यात देखील अतिवृष्टी झाली आहे. या पावसाचा हजारो शेतकऱ्यांना फटका बसला आहे. दुसरीकडे पुणे विभागात जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता मात्र त्यानंतर जुलै महिन्यात विभागात मुसळधार पाऊस झाल्याचे पहायला मिळाले.