मुंबई: राज्यात पुढील तीन दिवस हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा (Rain) इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह पुणे (pune) आणि सातारा (satara) जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 12 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्यानं ढग मोठ्या प्रमाणावर निर्माण होतायेत. परिणामी राज्यात पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी काळजी घ्यवी असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर सदृष्य स्थिती निर्माण झाली होती. विशेष: कोकणामध्ये जोरदार पाऊस झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. चिपळूनची वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रात पडलेल्या पावसामुळे अनेक धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नद्यांच्या पाणीपातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यातील ज्या दहा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्या जिल्ह्यात खबरदारी म्हणून एनडीआरएफचे पथकं देखील तैनात करण्यात आली आहे. मुंबईमध्ये देखील पाऊस सुरूच होता. मात्र कालपासून पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने मुंबकरांना दिलासा मिळाला आहे.
नांदेडमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलय. या जोरदार पावसामुळे अनेक शाळांनी आज सुट्टी जाहीर केली आहे. नांदेड शहरासह अनेक जागी ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, तर पावसाची संततधार अद्याप सुरूच आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलय. यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच मोठा पाऊस आहे. दरम्यान, नांदेडमध्ये पूर सदृश्य स्थिती निर्माण झाल्यास एनडीआरएफचे एक पथक तैनात ठेवण्यात आलेलं आहे. तसेच ओढे आणि नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आलंय.