मुंबई : महाराष्ट्रात कुपोषणामुळे (Malnutrition) होणाऱ्या बालमृत्यूचं (Child deaths) प्रमाण तर चिंताजनक आहेत. पण आता समोर आलेल्या धक्कादायक आकडेवारीतून बालविवाहाचं प्रमाणही लक्षणीय असल्याची नोंद करण्या आली आहे. बालविवाहाचं प्रमाण हे कुपोषणामुळे होणाऱ्या बळींच्या संख्येपेक्षा तब्बल दुप्पट असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High court) सादर करण्यात आलेल्या एका अहवालामध्ये ही आकडेवारी देण्यात आली. आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचं प्रमाण चिंताजनक आहे. इतकंच काय तर कुपोषणामुळे होणारे मृत्यूही चिंताजनक असल्याची आकडेवारी काळजी वाढवणारी आहे. गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात आदिवासीबुहल सोळ जिल्ह्यांमध्ये 15,253 बालविवाह झालेत. तर 6582 जणांचा बळी हा कुपोषणामुळे गेलाय. इंडिया टुडेच्या विद्या यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, अहवालात जारी करण्यात आलेली आकडेवारी हायकोर्टातील एका सुनावणी दरम्यान सादर करण्यात आली होती.
न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु होती. वकील आशुतोष कुंबकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार वरील आकडेवारी जारी करण्यात आली आहे. या अहवालात महाराष्ट्रातील बहुतांश आदिवासीबहुल सोळा जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला.
महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांमध्ये कुपोषणामुळे साडे सहा हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. त्यापैकी 601 प्रकरणांत बालविवाहाला बळी पडलेल्यांचा समावेश होता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुपोषणामुळे बाराशेपेक्षा जास्त मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. त्यातील 137 प्रकरणांमध्ये बाळाचा मृत्यू झालेली आई, ही अल्पवयीन असल्याची नोंद आहे. अमरावीतत 729 पैकी 75, गडचिरोलीत 804 पैकी 88 प्रकरणात झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूला बालविवाह कारणीभूत ठरल्याचंही या अहवालातून समोर आलं आहे.