VIDEO : छत्रपती शिवरायांची प्रतिमा स्वीकारताना राहुल गांधींनी केलं असं काही…, अमोल कोल्हे म्हणाले “हे चित्र माझ्यासह…”

| Updated on: Oct 05, 2024 | 10:33 PM

सध्या राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोल्हापुरातील या सभेदरम्यान राहुल गांधींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्याच्या घटनेवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

VIDEO : छत्रपती शिवरायांची प्रतिमा स्वीकारताना राहुल गांधींनी केलं असं काही..., अमोल कोल्हे म्हणाले हे चित्र माझ्यासह...
राहुल गांधी
Follow us on

Rahul Gandhi Footware Remove Video : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगात सुरु आहेत. देशातील अनेक वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने महाराष्ट्राचे दौरे सुरु आहेत. त्यातच आज काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा पार पडला. यावेळी त्यांनी कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केली. या सोहळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांच्यासह प्रदेश काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी राहुल गांधी यांच्या एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

कोल्हापुरातील कसबा बावडा या ठिकाणी असलेल्या भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हा बहुशस्त्रधारी भव्य पुतळा साकारला आहे. या पुतळ्याचे अनावरण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. या अनावरण सोहळ्यानंतर त्यांना या पुतळ्याची एक छोटी प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. ही प्रतिमा स्वीकारताना राहुल गांधींनी भर सभेदरम्यान त्यांच्या पायातील बूट बाजूला काढून ठेवले. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली.

अमोल कोल्हे काय म्हणाले?

डॉ. अमोल कोल्हे यांनी राहुल गांधींचा हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर ट्वीट केला. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी राहुल गांधींचे कौतुक केले. राहुल गांधी यांची कृती पाहून ‘मनात खरी श्रद्धा असेल तर काही कृती आपल्याकडून आपसूकच घडतात’ ही भावना दृढ झाली, असे अमोल कोल्हे म्हणाले.

आज मान. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्वीकारताना आपसूकच पादत्राणे बाजूला काढतानाचं चित्र माझ्यासह तमाम शिवशंभु भक्तांना अनामिक समाधान देणारं आहे. एक कलाकार व शिवशंभू भक्त या दोन्ही भूमिका निभावताना माझ्याकडूनही वैयक्तिक व सामाजिक जीवनात काही पथ्ये आपसूकच पाळली गेली आहेत.

छत्रपतींची प्रतिमा स्वीकारताना पादत्राणे काढून वंदन करणे, छत्रपतींचा पेहराव नसताना जिरेटोप न घालणे, पेहराव नसताना महाराजांचे संवाद न म्हणणे, जिरेटोप व कवड्यांची माळ घालताना नतमस्तक होणे… या गोष्टी कुणी सांगितल्या नाहीत किंवा मीही कधी आवर्जून ठरवलं नाही.. हे सगळं आपसुकच घडलं. आज मान. राहुल गांधी यांची कृती पाहून ‘मनात खरी श्रद्धा असेल तर काही कृती आपल्याकडून आपसूकच घडतात’ ही भावना दृढ झाली, असे अमोल कोल्हेंनी पोस्टमध्ये दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले.

राहुल गांधींचा व्हिडीओ व्हायरल

सध्या राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोल्हापुरातील या सभेदरम्यान राहुल गांधींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्याच्या घटनेवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्यामागे संदेश होता. तो संदेश असा होता की भाजपची विचारधारा चुकीची आहे. त्यांची नियत चांगली नसल्यामुळंच हा पुतळा पडला, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.