“मला ना नवऱ्याचा स्वभाव बदलता आला ना मुलांचा…”, नारायण राणेंच्या पत्नीने व्यक्त केली खंत, म्हणाल्या “आमची घराणेशाही…”

| Updated on: Nov 12, 2024 | 1:49 PM

देवगडमधील सभेत नीलम राणे यांनी महिलांना संबोधित केले. यावेळी त्यांनी नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांनाही भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

मला ना नवऱ्याचा स्वभाव बदलता आला ना मुलांचा..., नारायण राणेंच्या पत्नीने व्यक्त केली खंत, म्हणाल्या आमची घराणेशाही...
Follow us on

Narayan Rane Wife speech : “मला नारायण राणेंचा गर्व आहे. स्वभाव कुणाचे बदलता येत नाहीत. मला ना नवऱ्याचा स्वभाव बदलता आला ना मुलांचा” अशी खंत माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांनी व्यक्त केली. त्या देवगडमध्ये आयोजित एका सभेत बोलत होत्या. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. सध्या प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. यावेळी एका सभेत नारायण राणेंच्या पत्नीच्या केलेल्या वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे.

नारायण राणेंच्या पत्नी नीलम राणे या सध्या दोन्ही मुलांसाठी प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. नुकतंच कणकवली देवगड मतदारसंघातील वैभववाडी आणि देवगड तालुक्यात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवगडमधील सभेत नीलम राणे यांनी महिलांना संबोधित केले. यावेळी त्यांनी नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांनाही भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

“आता ते दोघेही शांत झाले”

निलेश राणे, नितेश राणे निवडून आल्यानंतर जर त्यांनी काम केले नाही तर आपण त्यांना प्रत्येक कामात विचारायचं. मग ते खासदार असो किंवा दोन्हीही आमदार असो. स्वभाव मात्र कोणाचे बदलता येत नाहीत. ना नवऱ्याचा बदलता आला ना दोन्ही मुलांचा बदलता आला. तो बदलायचं काम तुम्ही केलं तरी चालेल. आता ते दोघेही शांत झाले आहेत. कारण त्या दोघांनीही वयाची ४० शी ओलांडली आहे. तुमच्या आशीर्वादाने ते तिघेही चांगलं काम करतात. तुमची जी काही काम असतील ती करण्यास ते तिघेही बांधील आहेत, असे नीलम राणे म्हणाल्या.

“दोन्ही मतदारसंघात चांगला प्रतिसाद”

प्रथमच अस झालंय की मला दोन दोन मतदारसंघात प्रचार करावा लागतोय. पण मी अॅडजस्ट करतेय. प्रचाराचे शेड्युल सकाळी १० वाजल्यापासून सुरू होते आणि रात्री प्रचार आटोपून घरी जायला ११ वाजतात. शेतात काम आटोपून महिला सायंकाळी उशिरा येतात. त्यामुळे नंतर जावं लागत म्हणून वेळ होतो. आम्हाला दोन्ही मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळतोय. नितेशचा प्रश्न नाही. तो दोनवेळा निवडून आला आहे. मी जास्त फोकस निलेशसाठी कुडाळ मालवणमध्ये करतेय, असे नीलम राणेंनी म्हटले.

“मी घराणेशाही मानत नाही”

“जिथे महिला मतदार जास्त आहेत किंवा आपल्या विरोधी मते जास्त आहेत तिथे मी जाते. आम्हाला मत का द्यावं हे मी महिलांना पटवून सांगत असते. निलेश राणे किती मतांनी जिंकतील हे मी १५ किंवा १६ तारखेला सांगेन. साडे तीन वर्षात निलेशने कुडाळ मालवण मतदारसंघ पिंजून काढलाय. आमची घराणेशाही म्हणण्यापेक्षा…. बघा डॉक्टरची मुले डॉक्टरच होतात. आमच्या घरात पण तेच झालं. राणे साहेबांचं काम अगदी लहानपणापासून ते दोघे बघत आले. त्यामुळे त्यांनाही वाटलं की आपण असेच काम करावे. वडिलांकडून आलेले जिन्स आहेत. मी घराणेशाही आहे अस मानत नाही”, असे नीलम राणे म्हणाल्या.

“नितेश राणे अनेकदा हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आक्रमक भाषणे करतो. त्याची आई म्हणून मला खूप भीती वाटते. तो ज्या लोकांबद्दल बोलतो त्यांचा भरोसा नाही. मी सांगते,जास्त बोलू नकोस, पण त्याला जे वाटत ते तो बोलतो. आई वडील म्हणून आम्ही सांगत असतो. आम्ही वेळोवेळी त्याला सांगतो. पण मला भीती वाटते आणि वाटणारच”, असेही त्यांनी म्हटले.