नवी दिल्ली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित भाऊसाहेब चौधरी यांनी हा प्रवेश केला असून यावेळी पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे हे देखील उपस्थित होते. भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रवेशावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी या दरम्यान भाऊसाहेब चौधरी यांचं नाव घेणंच टाळलं आहे. मात्र, प्रतिक्रिया देत असतांना हकालपट्टी होईपर्यंत ते कुणाला माहितीतरी होते का ? जेव्हा पक्षातून हकालपट्टी झाली तेव्हा लोकांना ती व्यक्ती कळली. पक्षाने पदं दिली, त्यामुळे ते मोठे झाले. आम्हीच त्यांना पदं दिली. तेच काय सर्वच जणं पक्षात असले की जवळचे असतात. शिंदेही माझ्याजवळचे होते, दादा भुसे, उदय सामंत हेही माझ्याजवळचे होते असं संजय राऊत यांना म्हंटलं आहे.
मी पक्षाचा नेता आहे, त्यामुळे पक्षात असलेला प्रत्येक व्यक्ती माझ्याजवळचा असतो. असे लोक पक्षात येतात आणि जातात. पळपुटे लोक आहेत हे, असा टोला राऊत यांनी चौधरी यांना लगावला आहे.
त्यांचे काही व्यक्तिगत कारणं होती, काहींची मजबूरी असते. ते काही लोकनेते नव्हते. पक्षाने पदं दिली म्हणून मोठे होते. हकालपट्टी करेपर्यंत कुणाला नावही माहिती नव्हते.
मंत्री निघून गेले, संपर्कप्रमुख निघून गेलेत हे काय घेऊन बसलात म्हणून पत्रकारांवरच संजय राऊत भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.
भाऊसाहेब चौधरी यांचे सोडून जाणं आणि तेही शिंदे गटात जाणं हा राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे, त्यामुळे राऊत यांच्या हा विषय जिव्हारी लागल्याचे बोललं जात आहे.