Santosh Deshmukh Murder Case Update : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आता या हत्येप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह तीन जण फरार होते. त्यातील दोघांना पकडल्याचा दावा करण्यात येत आहे. याप्रकरणी आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सुरेश धस यांनाही टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संतोष देशमुख हत्याप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. तसेच त्यांना सुरेश धस यांनी याप्रकरणी केलेल्या आरोपांवरही विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.
“हे प्रकरण पोलिसांच्या तपासामध्ये आहे. न्यायप्रविष्ठ आहे. ज्यावेळी आम्हाला वाटेल की पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालत नाही, त्यावेळी हे प्रश्न आम्हाला विचारा. पोलिसांच्या कार्यवाहीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. पोलिसांच्या कार्यवाहीवर बाधा येईल असे काही करू नये. हे प्रकरण योग्य दिशेला न्यायचं असेल तर तपास सुरू राहिला पाहिजे”, असे संजय राऊत म्हणाले.
“सुरेश धस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. त्यांना बीडमधील हे राजकारण मोडीत काढायचा आहे. भूमिका मांडणे, राजकारण करणं यापेक्षा तपासाच्या संदर्भात प्रश्न निर्माण करणं हे महत्त्वाचं आहे. मोर्चाला जाणार तिथे जाऊन पत्रकार परिषद घेणं या गोष्टी टाळल्या पाहिजेत. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी आणि बीडचे संतोष देशमुख यांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंबिय दु:खात आहेत. त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे. त्याशिवाय ते बोलणार नाहीत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना बीडमधला दहशतवाद मोडून काढायचा आहे. त्यांनाही बंदुकीचे राज्य संपवायचे आहे. ज्यादिवशी आम्हाला वाटेल की यात पडद्यामागे वेगळं घडतंय, तेव्हा आम्ही पुन्हा एकदा या प्रश्नाला वाचा फोडू”, असे संजय राऊतांनी म्हटले.
“उद्धव ठाकरे लवकरच त्यांना भेटतील. ते राजकारण करण्यासाठी नाही. आम्ही फक्त वाट पाहत आहोत. पोलीस नेमकी काय कार्यवाही करत आहेत. याप्रकरणी सर्व आरोपींची अटक झाली त्यानंतर आम्ही सांत्वन करण्यासाठी जाऊ, राजकारणासाठी नाही”, असे संजय राऊत म्हणाले.