Pankaja Munde : सोनं, चांदी आणि कोट्यवधीची संपत्ती, पण नावावर एकही गाडी नाही; पंकजा मुंडे यांची एकूण मालमत्ता किती?

| Updated on: Jul 03, 2024 | 11:05 AM

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे विधान परिषदेच्या आखाड्यात उभ्या आहेत. या निवडणुकीत एकूण 14 जण मैदानात आहेत. एकूण 11 जागांसाठी ही निवडणूक होणार असून येत्या 12 जुलै रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. त्यामुळे त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून त्यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती असल्याचं समोर आलं आहे.

Pankaja Munde : सोनं, चांदी आणि कोट्यवधीची संपत्ती, पण नावावर एकही गाडी नाही; पंकजा मुंडे यांची एकूण मालमत्ता किती?
Follow us on

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या मैदानात उभ्या ठाकल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी काल विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही भरला आहे. येत्या 12 जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण विजयी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पंकजा मुंडे यांनी काल निवडणुकीचा अर्ज भरताना आपल्या मालमत्तेची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार पंकजा यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती असल्याचं आढळून आलं आहे. पण त्यांच्या नावावर कोणतंही वाहन नसल्याचंही त्यांनी शपथपत्रात म्हटलं आहे.

पंकजा मुंडे यांनी काल निवडणुकीसाठीचं शपथपत्र दाखल केलं आहे. त्यात त्यांनी त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेची माहिती दिली आहे. पंकजा मुंडे यांच्या नावे विविध बँक खात्यात मोठ्या ठेवी आहेत. एकूण 91 लाख 23 हजार 861 रुपयांच्या ठेवी त्यांच्या नावावर विविध बँक खात्यात आहेत. त्यांनी विविध शेअर आणि म्युच्युअल फंडमध्ये 1 कोटी 28 लाख 75 हजार 694 रुपयांची गुंतवणूक केली आहे.

शेती, घरभाडे उत्पन्नाचे स्त्रोत

पंकजा मुंडे यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण असल्याची माहिती नमूद केली आहे. तसेच त्यांचा व्यवसाय शेती आणि समाजसेवा असल्याचं म्हटलं आहे. शेती आणि माजी विधानसभा सदस्य म्हणून येणारं निवृत्ती वेतन आणि घरभाडे हेच आपले उत्पन्नाचे स्त्रोत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कर्जाचा डोंगर

पंकजा मुंडे यांच्या स्थावर मालमत्तेची किंमत 96 लाख 73 हजार 490 रुपये इतकी आहे. तर त्यांच्याकडे 6 कोटी 8 लाख 15 हजार 709 रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. पंकजा यांच्या नावावर 2 कोटी 74 लाख 89 हजार 518 रुपयांचं कर्ज आहे. तर त्यांच्या पतीच्या नावावर 2 कोटी 50 लाख 32 हजार 427 रुपयांचे कर्ज आहे. या शिवाय त्यांच्या पतीच्या नावे 24 कोटी 77 लाख 75 हजार 918 रुपयांचं वैयक्तिक कर्ज आहे.

 

सोनं, चांदी किती?

पंकजा मुंडे यांच्याकडे 2 लाख 84 हजार 530 इतकी रोख रक्कम आहे. त्यांच्याकडे 450 ग्रॅमचे 32 लाख 85 हजार रुपये किंमत असलेले सोने आहे. तसेच त्यांच्याकडे चार किलो चांदी आहे. त्याची किंमत 3 लाख 28 हजार रुपये आहे. त्याशिवाय इतर दागिन्यांची किंमत 2 लाख 30 हजार रुपये आहे. त्यांच्या पतीकडे 200 ग्रॅम सोने असून त्याची किंमत 13 लाख रुपये आहे. त्यांच्या पतीकडे 2 किलो चांदी आहे. त्याची किंमत 1 लाख 38 हजार रुपये आहे. त्यांच्या पतीकडे असलेल्या इतर दागिन्यांची किंमत 2 लाख 15 हजार रुपये आहे. मात्र, पंकजा मुंडे यांच्याकडे एकही वाहन नसल्याचं त्यांनी शपथपत्रात म्हटलं आहे.