मुंबई : कडाक्याचा उन्हाळा सुरू असताना एसटीच्या प्रवाशांना महामंडळाच्या जागेवर उभ्या असलेल्या नाथजल या बाटलीबंद पाण्याची बाटली विक्रेत्यांकडून अक्षरश: नाडले जात आहे. कुलिंग चार्जच्या नावखाली पंधरा रूपयांच्या नाथजल बाटली बंद पाण्याची विक्री चक्क 20 रूपयांना केली जात आहे. याबाबत नाशिक रोड बसस्थानकातील संबंधित नाथजल विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल होताच एसटी महामंडळाने त्याची दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
भारतीय रेल्वेच्या रेलनीर बाटलीबंद पाण्याच्या धर्तीवर महामंडळाच्या प्रवाशांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी ‘नाथजल’ नावाने बाटली बंद पाण्याची विक्री केली जाते. परंतू अलिकडे कुलींग चार्जच्या नावाखाली या बाटल्यांमागे पाच रूपये अतिरिक्त चार्ज आकारून नाथजलची विक्री केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांचे विक्रेत्यांची खटके उडत आहेत. छापिल किंमतीपेक्षा जादा किंमत वसुल केली जात असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. नाशिक बसस्थानकांतील नाथजल विक्रेत्याने पंधरा रूपयांचे एक लिटरचे नाथजल 20 रुपयांना विकणाऱ्या प्रतिनिधीचा व्हिडीओ एका जागरूक नागरीकाने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद मिळून तो व्हायरल झाल्याने महामंडळाने तातडीने पत्रक काढले आहे.
नाशिक रोड बस स्थानकातील विक्रेता पंधरा रूपयांची नाथजलची बाटली वीस रूपयांना विकत असल्याची चित्रफीत व्हायरल झाली आहे. संबंधित चित्रफित व्हायरल झाल्यानंतर महामंडळाने त्याची दखल घेत संबंधित जागा भाड्याने दिलेल्या मे.शेळके बेव्हरेजेस प्रा.लि. पुणे यांना पत्र लिहीले आहे. त्यात त्यांनी तुम्ही नेमलेल्या प्रतिनिधी अव्वाच्या सव्वा दरात नाथजल विकत आहेत, तसेच प्रवाशांना अर्वाच्च भाषेत उत्तरे देत आहेत. त्यामुळे संबंधिताचा परवाना तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात यावा व नव्याने प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात यावी.
एसटी महामंडळ आता कुठं उभारी घेतंय, तिची आर्थिक घडी आता कुठं नीट बसत असताना या अश्या घटनेमुळे महामंडळाची प्रतिमा मालिन होत नाही का..?
१५/- ची बाटली २०/- हा, नाथजल पाणी बॉटल घोटाळा सर्वश्रुत असताना, या असल्या ‘थर्ड क्लास’ वेंडरना एसटीने वेळीच आळा बसवणे अत्यंत गरजेचे आहे. pic.twitter.com/UU5SRhxJro
— Rohit Dhende (@avaliyapravasi) May 19, 2023
नाथजल विक्री प्रतिनिधीच्या तक्रारी वारंवार येत असल्याने आपणास 50,000 दंड म्हणून का आकारू नये याचा खुलासा तातडीने करावा, तसेच महाराष्ट्रातील इतर बसस्थानकात आपल्यामार्फत नियुक्त प्रतिनिधींना देखील समज द्यावी अन्यथा यापुढे तक्रार आल्यास शासन म्हणून 50,000 रूपयांचा दंड आपणाकडून वसुल केला जाईल तसेच विनासबब जागेचा ताबा महामंडळामार्फत घेण्यात येईल अशी नोटीस एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक ( नियोजन आणि पणन )यांनी बजावली आहे.