मुंबई : पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेसाठी महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यातून दरवर्षी भाविकांची अक्षरश: यात्रा भरत असते. त्यामुळे वारकरी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा राज्यभरातून पाच हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री गेस्ट हाऊस येथे झालेल्या बैठकीत दिले आहेत. दि. 25 जुन ते 5 जुलै या दरम्यान या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. तसेच वाखरी येथे 27 जून रोजी होणाऱ्या माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी 200 अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने केलेल्या जादा बसेसच्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत सोमवारी घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य शेतकरी आणि कष्टकरी जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी महाराज नगर , नागपूर, अमरावती या सहा डीव्हीजनमधून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी सुमारे 5000 गाड्या सोडण्याचे नियोजन एसटीतर्फे करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर प्रदेशातून 1200, मुंबई 500, नागपूर 100, पुणे 1200, नाशिक 1000 तर अमरावती येथून 700 अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुर्ती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.