मुंबई : एसटी महामंडळाने ( MSRTC ) आपल्या ताफ्यातील ‘हिरकणी’ बसेसना ( Hirkani Buses ) आधुनिक रुप दिले आहे. या हिरकणी बसेसना बांधताना आता अॅल्युमिनिअम ऐवजी माईल्ड स्टीलचा वापर करण्यात आला आहे. या बसेसची बांधणी एसटीच्या दापोडी आणि अन्य कार्यशाळेत होत असून उद्यापासून एसटीच्या रायगड ( Raigad ) विभागात नवीन हायटेक ‘हिरकणी’ची सेवा सुरू होणार आहे. या बसेस बीएस – 6 श्रेणीच्या असून एअर सस्पेंशन तंत्राच्या या बसेसना आरामदायी पुशबॅक आसने, मोबाईल चार्जिंग पॉईंट, रिडींग लॅंप आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
एसटीच्या रायगड विभागात उद्यापासून दहा हिरकणी बसेस सेवेत येणार आहेत. त्यानंतर दोन दिवसांनी आणखी दहा अशा 20 बसेस रायगड विभागाला मिळणार आहेत. या नवीन हिरकणी बसेस रायगड विभागाच्या रोहा आणि मुरूड आगाराला मिळणार आहेत. या बसेसची उंची आधीच्या बसेस पेक्षा थोडी कमी आहे. या बसेसमध्ये आरामदायी पुशबॅक आसने, मोबाईल चार्जर पॉईंट, आसनाजवळ रिडींग लाईट असणार आहेत. तसेच या बसेस एअर सस्पेंशन सुविधेच्या असणार आहेत.
एसटी महामंडळाचा लोकप्रिय ब्रॅंड हिरकणी आता हायटेक होत आहे. या बसेसची बांधणी माईल्ड स्टीलमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे या बसेसमध्ये पारंपारिक बसेसमध्ये होणारा धडधड, खुडखुड आवाज येणार नाही. तसेच माईल्ड स्टीलचा समावेश असल्याने अपघातात कमी हानी होत असल्याने प्रवाशांच्या वाहतूकीसाठी देखील या बसेस निर्धोकपणे वापरता येणार आहे. या बसेसना पूर्वी हिरवा आणि जांभळा रंग असायचा आता त्यांनी रंगसंगती बदलण्यात आली आहे.
एसटीच्या एशियाड स्पर्धांच्यावेळी 1982 साली खेळाडूंची ने-आण करण्यासाठी प्रथम एशियाड बसेस बांधून दिल्या होत्या. या बसेसचं कौतूक माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील केले होते. आशियाई खेळ संपल्यावर या बसेस पुन्हा महाराष्ट्राने विकत घेतल्या आणि ( दादर ) मुंबई ते पुणे मार्गावर त्या चालविल्या. त्यामुळे एशियाड हा ब्रॅंड लोकप्रिय झाला. या एशियाड बसेसनाच नंतर ‘हिरकणी’ हे नाव देण्यात आले. हिरकणी बसेस एसटी महामंडळात रातराणी म्हणून चालविण्यात येतात.
● आकर्षक अंतर्गत आणि बाह्य रंगसंगती
● पुशबॅक सीट्स
● रीडिंग लॅम्प
● आसनांजवळ USB मोबाईल चार्जिंगची सुविधा
● एअर सस्पेंशन बस