अमरावती: राज्यभरात वेगाने हातपाय पसरत असलेल्या म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या बुरशीजन्य रोगाने आता अमरावती जिल्ह्यातही शिरकाव केला आहे. अमरावतीमध्ये आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 10 रूग्ण आढळले आहेत. सुदैवाने यापैकी चार रुग्ण बरे झाले असून अद्याप सहा जणांवर उपचार सुरु आहेत. (Mucormycosis infection increases in Maharashtra)
म्युकरमायकोसिसचे हे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन आहे. त्यामुळे रुग्णांची फुफुसांची क्षमता वाढवण्यासाठी टीबी रुग्णालय परिसरात पुनर्वसन केंद्र सुरू केले असून त्याठिकाणी रुग्णांना व्यायाम, योगा शिकवले जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. तुर्तास जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण दगावलेला नाही. मात्र, या आजाराचा जिल्हात शिरकाव झाल्याने अमरावतीत खळबळ उडाली आहे, असे डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.
आतापर्यंत केवळ ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांना म्युकरमायकोसिसची लागण होताना दिसत होती. मात्र, आता हा रोग शहरी भागांमध्येही हातपाय पसरायला लागला आहे. ठाणे आणि डोंबिवलीत अनेकजणांना म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे. यापैकी डोंबिवलीतील दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.
कोरोनाइतक्याच प्राणघातक असलेल्या म्युकरमायकोसिस (mucormycosis) आजाराचा राज्यभरात वेगाने फैलाव होत असल्यामुळे आता ठाकरे सरकार कमालीचे सावध झाले आहे. हा आजार दुर्मिळ असल्याने राज्यात आतापासूनच त्यावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटला म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या 1 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिल्याचे समजते.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती दिली. म्युकोरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून त्याबाबत तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत या आजारावर मोफत उपचार करता येतील का, याबाबत विचारविनिमय सुरु असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
कोरोनापेक्षा जास्त प्राणघातक असलेल्या म्युकोरमायकोसिसचा राज्यात पहिला बळी; डोंबिवलीत वृद्धाचा मृत्यू
सावधान, धोका वाढतोय; ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचा झपाट्याने संसर्ग, नव्या संकटाची चाहुल?
(Mucormycosis infection increases in Maharashtra)