नागपूर : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील आढळलेल्या गाडीतलं जिलेटीन हे नागपुरातल्या कंपनीत बनल्याचं आता पोलीस तपासात समोर आलंय. नागपूरच्या सोलार इंडस्ट्रीमध्ये हे जिलेटीन बनल्याचं आता समोर आलं आहे. कंपनीचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी ही माहिती दिली आहे. (Mukesh Ambani Explosive In Car Nagpur Connection Solar Explosive)
मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात सोलार इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांच्याशी रात्री दीड वाजता फोनवर चर्चा केली. सोलार इंडस्ट्रीजकडून ज्या ज्या लोकांना जिलेटीन दिले गेलंय याची माहिती मुंबई पोलिसांनी घेतलेली आहे, अशी माहिती समोर आलेली आहे.
होय ते आमच्या कंपनीचं प्रोडक्ट आहे. परंतु आमच्या प्रोडक्टला जर कुणाची मागणी आली तर तर ती एक्सप्लोजीव डिपार्टमेंटला येते आणि नंतर त्यांच्या थ्रू ती आमच्याकडे येते, त्यामुळे आमच्याकडे सगळे रेकॉर्ड असतात. आम्ही आतापर्यंत ज्या ज्या लोकांना जिलेटीन दिलंय, त्यांची माहिती आम्ही पोलिसांनी दिली आहे, असं कंपनीचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी सांगितलं.
दरम्यान, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास संशयित गाडी आढळली होती. अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ गाडीत काही स्फोटके सापडली. तसंच घातपाताच्या उद्देशाने ठेवल्याचा संशयही व्यक्त करण्यात येतोय. संशयास्पदरित्या स्फोटक भरुन आलेली ही गाडी विक्रोळी इथून चोरी झाल्याची माहिती आता समोर येत आहे. सात ते आठ दिवसांपूर्वी ही गाडी चोरी झाली होती, अशी माहिती आहे. तशी तक्रारही विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती आहे.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर पार्क केलेल्या गाडीत स्फोटकांच्या बॅगसोबत एक पत्रही पोलिसांनी मिळाले. या पत्रातून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. ‘डियर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है अगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे फॅमिली को उडाने….संभल जाना…’, असा मजकूर या पत्रात असल्याचे समजते.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर बुधवारी मध्यरात्री एक वाजता स्कॉर्पिओ आणि इनोव्हा अशा दोन गाड्या आल्या होत्या. एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून ही गोष्ट समोर आली होती. यापैकी स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके होती. ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केल्यानंतर चालक गाडीतून उतरला आणि इनोव्हा गाडीत बसून निघून गेला.
या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या गाडीत काही नंबरप्लेटसही मिळाल्या. या नंबरप्लेटस नक्की कशासाठी होता याचा उलगडा होऊ शकलेला नाही.
(Mukesh Ambani Explosive In Car Nagpur Connection Solar Explosive)
हे ही वाचा :
अंबानींच्या घराबाहेर सापडलेली कार चोरीची; विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून झाली चोरी