सहा महिन्यांपूर्वी, जुलैमध्ये राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’ घोषणा केली. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील कोट्यवधी महिलांना आत्तापर्यंत दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. डिसेंबर महिन्याचे पैसेही 2 कोटींहून अधिक पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले . मात्र आता नववर्ष आलं, जानेवारी महीना सुरू होऊन 15 दिवस उलटून गेले, तरी या महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेले नसून जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा अनेक बहिणींना आहे.
आत्तापर्यंत किती महिलांना पैसे मिळाले ?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जुलै ते डिसेंबर असे प्रत्येक महिन्याचे 1500 मिळून एकूण 9 हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यभराती सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजेनचा लाभ घेतला आहे. मात्र आता जानेवारी महिन्याचे 15 दिवस उलटले तरी या महिन्याच्या हप्त्याबाबत काहीच , ते पैसे कधी मिळणार याब्दल काहीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे जानेवारीचा हप्ता आम्हाला कधी मिळणार ? असा सवाल अनेक महिलांनी विचारण्यास सुरूवात केली आहे.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. हायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले. महायुतीचे 230 जागांवर उमेदवार निवडून आले. भाजपला प्रथमच 132 जागा मिळाल्या. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 जागांवर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 41 जागांवर विजय मिळाला. विदानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी केले होते, त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार हा सवाल अनेक महिलांच्या ओठी होता. काही दिवसांपूर्वीच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं . मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होणार. अर्थ संकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील, असं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बजेटमध्ये यावर विचार केला जाईल, असे सांगितले. त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात योजनेत सुधारणा होण्याची शक्यता असून त्यानंतर महिलांना 2100 रुपये मिळणार का हे स्पष्ट होईल.
छगन भुजबळ यांचे वक्तव्य होतं चर्चेत
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया देत जे विधान केलं होतं, ते चर्चेत आलं होतं. ज्या महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र नाही अशा महिलांकडून दंडासहित पैसे वसूल केले जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. ‘गरीबांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे हाच या योजनेचा उद्देश आहे. मात्र या योजनेचे काही नियम आहेत. ज्यामध्ये एका घरात दोन महिलांना पैसे देता येत नाहीत, मोटार गाडी असेल तर त्यांना पैसे देता येणार नाहीत. गरीबांना त्याचा लाभ झाला पाहिजे हा या योजनेचा उद्देश आहे. ज्या महिला नियमात बसत नाहीत, त्यांनी स्वतःहून आपली नावे काढली पाहिजेत. जे पैसे दिले गेले आता ते परत मागण्यात काही अर्थ नाही ते आता मागण्यात येवू नयेत, याच्यापुढे लोकांना सांगावं, जे नियमात नाही त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावेत. त्यांनी जर तसं नाही केलं तर मग मात्र दंडासह पैशांची वसुली करावी’, असं भुजबळ म्हणाले होते.