नागपूर: एकीकडे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचे प्रमाण वाढत असताना आता लहान मुलांनाही नव्या आजाराची लागण होताना दिसत आहे. नागपूरमध्ये या नव्या आजाराचे 30 रुग्ण आढळून आले असून यापैकी एकाचा मृत्यूही झाला आहे. कोरोना (Coronavirus) होऊन गेल्यानंतर लहान मुलांना ‘मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिन्ड्रोम’ची बाधा होताना दिसत आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये विविध विकार उद्भवताना दिसत आहेत. मृत्यू झालेल्या एका रुग्णाला ब्रेन ट्युमर झाल्याची माहिती आता समोर आली आहे. (New infection in kids after Coronavirus)
कोरोना संक्रमण झाल्यानंतर दोन ते सहा आठवड्यांनी लहान मुलांमध्ये ‘मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिन्ड्रोम’ची लक्षणे जाणवायला लागतात. त्यामुळे पालकांनी याबाबतीत तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
औरंगाबादमध्ये सध्या कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिस हा आजार थैमान घालताना दिसत आहे. म्युकरमायकोसिसमुळे औरंगाबादमध्ये गेल्या दीड महिन्यांत 16 जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 201 रुग्णांना म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. आतापर्यंत 113 जणांचे डोळे काढण्यात आले आहेत.
राज्यात म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण औरंगाबादेत आहेत. सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण सुद्धा औरंगाबादमध्येच आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणा प्रचंड धास्तावली आहे.
देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रचंड कहर सुरू आहे. ही लाट आटोक्यात येताच तीन-चार महिन्यानंतर तिसऱ्या लाटेचा धोका उभा राहणार आहे. या लाटेत लहान मुलांना संसर्ग अधिक होण्याची शक्यता केंद्र सरकारच्या सल्लागारांनी वर्तवली आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांनाही कोरोना प्रतिबंधक लस टोचली जात आहे. देशात अद्याप लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे.
संबंधित बातम्या:
Coronavirus in kids : कोरोनाची दुसरी लाट लहान मुलांसाठी घातक, असे ठेवा मुलांना सुरक्षित
तिसऱ्या लाटेपूर्वीच पुण्यात लहान मुलांना कोरोना संसर्ग! 1 वर्षाखालील 249 चिमुकल्यांना कोरोनाची लागण
लहान मुलांसाठी सर्वाधिक धोकादायक आहे 2021 चा कोरोना, महाराष्ट्रात 60,684 मुले कोरोना संक्रमित
(New infection in kids after Coronavirus)