मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने धोरण आखलं आहे. मुलींच्या सन्मानासाठी राज्य सरकारकडून ‘लेक लाडकी’ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. मुलींना लखपती करणारी ही योजना आहे. या योजनेची घोषणा आज सरकारकडून घोषणा झाली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे. ‘लेक लाडकी’ योजना राज्य सरकारने सुरु केली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही धोरण राबवत आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सरकार राबवत आहे. मुलींनी सक्षम व्हावं. स्वत:च्या पायावर उभं राहावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. एखाद्या घरात मुलीचा जन्म झाल्यास त्या कुटुंबाला पाच हजार रुपये सरकारकडून देण्यात येतील. ती मुलगी पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रूपये देण्यात येतील. तर सहावी इयत्तेत गेल्यावर सात हजार रूपये तर अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये, वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये असे मिळून एक लाख रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
मार्च 2023 च्या आर्थसंकल्पीय अधिवेशनात लेक लाडकी योजनेची घोषणा केली होती. आज त्याचा अंतिम प्रस्ताव करण्यात आला. जो प्रस्ताव झाला आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. 1 लाख 1 हजार रुपये अशी या योजनेची रक्कम आहे. जी मूळ संकल्पना अशी होती की, मुलीचा जन्म झाल्यानंतर तिला ही रक्कम देण्यात येईल. ती मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत ही मदत टप्प्या टप्प्यात होत राहणार आहे, असं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी ही योजना आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आम्ही या योजनेची सुरुवात करत आहोत. मुलींना सक्षम करण्यासाठी ही योजना आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान याला देखील मागच्या मंत्रिमंडळात मान्यता मिळाली आहे. त्यापाठोपाठ ही योजना राबवण्यात येत आहे. शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला जात आहे, असं आदिती तटकरे म्हणाल्या.