मुंबई : 21 ऑगस्ट 2023 | नवसाला पावणारा गणपती अशी जगभरात ख्याती पावलेल्या ‘लालबागचा राजा’च्या आगमनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. मुंबईसह राज्यभरातून अनेक भाविक आणि सेलिब्रेटी येथे येऊन मनोभावे प्रार्थना करतात, नवस बोलतात. त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी इथे भाविकांची रांगच रांग लागते. याच लालबागचा राजाचे मुख्य प्रवेशद्वाराचे यंदाही आकर्षण असणार आहे. मात्र, लालबागच्या राजालाही यंदा कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची उणीव जाणवतेय. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली होती. मात्र, याच नितीन देसाई यांनी गेल्यावर्षी लालबागच्या राजाबाबत एक मोठे विधान केल होते, अशी माहिती त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराने दिली.
जगविख्यात अशा लालबागच्या राज्याच्या आगमनाला काही दिवसांचा अवधी आहे. त्याच्या आगमनापूर्वी येथील सजावटीसाठी कामगार मंडळी तयारीला लागली आहेत. लालबागच्या राजाचे मुख्य प्रवेशद्वार, आकर्षक रोषणाई, देखावा याचे काम नितीन देसाई यांच्या कंपनीला अनेक वर्ष दिले जात आहेत.
यंदाचा भव्यदिव्य देखावा उभारण्याचे कामही नितीन देसाई यांच्या कंपनीला देण्यात आले. नितीन देसाई यांनी अकस्मात आपले जीवन संपवले. त्यामुळे लालबाग राजाचे डेकोरेशन कोण करणार? हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. मात्र, नितीन देसाई यांच्यासोबत काम केलेल्या कर्मचाऱ्यांनी आपली सगळी कल्पनाशक्ती पणाला लावून मंडप डेकोरेशनचे काम हाती घेतले.
लालबागच्या राजाचे मुख्य प्रवेशद्वारावर यंदा रायगड किल्ल्याच्या देखाव्याने आपले स्वागत करणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्या निमित्ताने लालबाग राजा या ठिकाणी भव्य दिव्य प्रवेश व्दार बनवण्यास सुरुवात केली आहे.
गेले तीन महिने हे कामगार पगार न घेता अविरत काम करत आहेत. केवळ आणि केवळ बाप्पाच्या सेवेसाठी आपण काम करतोय. नितीन देसाई असे पाऊल उचलतील याचा आयुष्यात कधी विचारही केला नव्हता. आज याप्रसंगी त्यांची फार आठवण येते अशी भावना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नितीन दादा यांच्या जाण्याचे दु:ख होत आहे. त्यांनी कधीही कुणाचा पगार बुडवला नाही. आताचा प्रसंग हा आमच्यासाठी अत्यंत दुःखाचा प्रसंग आहे. पण आम्ही काम करत आहोत. गेल्या वर्षी दादा म्हणाले होते की ही माझी शेवटची कलाकृती आहे आणि तसेच झाले. दादांनी गेल्यावर्षी बनविलेली कलाकृती त्यांच्यासाठी अखेरची ठरली असे या कामगारांनी सांगितले.