Harshal Bhadane Patil Accident : धुळे शहरात एक भीषण अपघात घडला आहे. एका ट्रक चालकाने चार चाकी वाहनाला धडक दिली. या धडकेत धुळे जिल्ह्यातील रहिवाशी आणि मुंबईत कार्यरत असलेले तरुण पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार हर्षल भदाणे पाटील हे त्यांच्या गावी गेले होते. हर्षल पाटील हे गावावरुन परतत असताना धुळे जिल्ह्यातील गरताड गावाजवळ त्यांनी त्यांची कार उभी केली. त्यावेळी धुळे-औरंगाबाद महामार्गावर समोर आलेल्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. यावेळी हर्षल भदाणे पाटील यांनी स्वतःला वाचवण्यासाठी कारमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी ते ट्रकच्या चाकाखाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. काल (29 जुलै) हा भीषण अपघात झाला.
या कारमध्ये हर्षल भदाणे यांच्यासह आणखी दोन जण बसले होते. हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना धुळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे धुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. पण काही नागरिकांनी ट्रकचालकाचा पाठलाग करत त्याला बेदम चोप दिला.
या घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिसांनी सदर ट्रक चालक आणि त्याच्या एका सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. या घटनेनंतर ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी आणि ट्रक चालकाला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांसहित सर्व मित्र परिवाराने केली आहे.
हर्षल भदाणे पाटील यांनी पत्रकारिता क्षेत्रात सात वर्षांहून अधिक काळ काम केलं. मनमिळाऊ स्वभावामुळे मुंबईतील पत्रकारांच्या वर्तुळात त्यांची चांगली ओळख होती. वृत्त निवेदक आणि पत्रकार अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या. हर्षल भदाणे यांच्या पश्चात त्यांची आई, वडील आणि पत्नी असा परिवार आहे. हर्षल भदाणे हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होते. हर्षल भदाणे यांच्या जाण्याने भदाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.