यवतमाळ : विरोधकांसह सर्वसामान्य नागरिक आणि प्रवासी संघटनांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर राज्य सरकारनं सर्वसामान्य नागरिकांना लोकल (Mumbai Local) प्रवासाची मुभा दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल त्याबाबत घोषणा केली आहे. मात्र, या लोकल प्रवासाबाबत राज्य सरकारनं काही अटी घातल्या आहेत. दरम्यान, लोकल प्रवासाबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारनं रेल्वे बोर्डाकडे पाठवल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे. ते यवतमाळमध्ये बोलत होते. त्यामुळे आता रेल्वे बोर्ड राज्याच्या या प्रस्तावाला कसा प्रतिसाद देतं हे पाहावं लागणार आहे. (State Government’s proposal to Railway Board regarding Mumbai local travel)
राज्य सरकारनं दोन डोस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करण्यास मुभा दिली आहे. मात्र, हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाशी चर्चाच केली नसल्याचं उघड झालं आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तसे सुतोवाचही केलं आहे. रावसाहेब दानवे यांनी टीव्ही 9 मराठीशा संवाद साधताना हे स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकलबाबत जो निर्णय घेतला आहे. त्याचं स्वागतच आहे. राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे येत्या 15 ऑगस्टपासून आम्ही काही प्रमाणात लोकल सुरू करू. कोरोनाची स्थितीही आता आटोक्यात आली आहे. पण निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वेशी थोडी चर्चा केली असती तर बरं झालं असतं. पण तरीही सरकारच्या या निर्णयाला रेल्वे प्रतिसाद देईल, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
रेल्वेची भूमिका स्पष्ट आहे. प्रवासी तपासून आत सोडण्यात येईल. आम्ही लोकल सुरू करण्यास सज्ज आहोत. मात्र, प्रवाशांचे प्रमाणपत्रं तपासण्यासाठी राज्य सरकारनेही स्वत:ची यंत्रणा उभी केली पाहिजे. ही राज्याचीही जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. आमची कसली नाराजी नाही. उलट आम्ही खूश आहोत. ज्या अडचणी येतील त्या चर्चेतून सोडवता आल्या असत्या, असंही ते म्हणाले.
लोकल प्रवासासाठी दोन डोस घेतलेल्यांना महापालिका किंवा राज्य सरकारकडून फोटो पास देण्यात येईल. हे एकप्रकारचे इम्युनिटी सर्टिफिकेट असेल, या फोटो पासच्या आधारावरच तुम्हाला रेल्वेचा पास मिळेल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. महत्त्वाचं म्हणजे जरी दुसरा डोस घेतला असला, तरी डोस घेऊन 14 दिवस झाल्यानंतरच ओळखपत्र दिलं जाईल. त्यानंतरच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे. म्हणेज 14 दिवसांची अट पूर्ण करावी लागणार आहे.
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्र्यांनी लोकलचा सोपा प्रश्न अवघड केला, परवानगी देताना नवे अडथळे निर्माण केल्याचा भाजपचा आरोप
State Government’s proposal to Railway Board regarding Mumbai local travel