मुंबई | महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धेचा विजेता कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील (Pruthviraj Patil) याने नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. अवघ्या 19 व्या वर्षात ही स्पर्धा जिंकणाऱ्या पृथ्वीराजची स्वप्न मोठी आहेत. ऑलिंपिक स्पर्धांमध्ये आपलं नाव उमटवण्याचं त्याचं ध्येय आहे, यासाठी परदेशात प्रशिक्षणासाठी जाण्याचीही तयारी आहे. मात्र स्पर्धेत बक्षीसापोटी घोषित झालेली रक्कमच अद्याप मिळाली नसल्याची खंत त्याने शरद पवार यांच्याकडे बोलून दाखवली. पृथ्वीराज पाटील याने आज शरद पवार यांची भेट घेतली.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज पाटील याने आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. पवार यांना भेटल्यानंतर पृथ्वीराजने पत्रकारांशी संवाद साधला. या भेटीत आपण स्पर्धेची बक्षीसाची रक्कम न मिळाल्याची खंत बोलून दाखवली, असे पृथ्वीराज म्हणाला. मला ऑलिंपिक पदक जिंकायचं आहे. भारतासाठी खेळायचं आहे. यासाठी सरकारकडूनही काही अपेक्षा आहेत. परदेशात प्रशिक्षणासाठी जाण्याची माझी तयारी आहे. आतापर्यंत अनेक राजकीय पक्षांनी मदतीचा हात दिला आहे. मात्र कुस्ती संघटनेकडून बक्षीसाची रक्कम अद्याप मिळाली नाही, अशी खंत व्यक्त केल्याचं पृथ्वीराजने सांगितलं.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पृथ्वीराज पाटील याने पटकावली असून तब्बल 21 वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्याला हा मान मिळाला आहे. मुंबईचा पैलवान प्रकाश बनकर याला पराभूत करून पृथ्वीराजने हा किताब जिंकला. प्रकाश बनकर हा या स्पर्धेत उपमहाराष्ट्र केसरी ठरला. 19 वर्षाचा पृथ्वीराज पाटील हा शेतकरी कुटुंबातील मुलगा असून त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. आतापर्यंत त्याने अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदके मिळवली आहेत. पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी ठरल्यानंतर त्याला एक लाखाचा धनादेश देऊन गौरवण्यात आलं. मात्र हा धनादेश नावापुरता असल्याचं सांगण्यात आलं. त्याला बक्षीसाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. याबद्दल सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या-