मुंबई | 29 नोव्हेंबर 2023 : शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी एक मोठा दावा केला आहे. येत्या काळात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढणार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे गटाने जेवढी कागदपत्रे दिलेली आहेत. ती खोटी आहेत. कागदपत्रावर ज्या सह्या आहेत. त्या देखील खोट्या सह्या आहेत. शिवसेनेच्या घटनेनुसार पक्ष प्रमुखपद हे अस्तित्वातच नाहीये, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या अडचणी वाढणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
शिवसेना पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. आजपासून पुढील चार दिवस सलग सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होत आहे. याआधी ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. आता आज पुन्हा आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीआधी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या घटनेचा संदर्भ दिला आहे.
राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्हाबाबत आज संध्याकाळी 4 वाजता सुनावणी होणार आहे. पक्ष नेमका कुणाचा आणि राष्ट्रवादीचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचं? याबाबत निवडणूक आयोगात आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काल रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत. या सुनावणीसाठी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत. तर सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड दिल्लीला जाणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. तेव्हा ठाकरे गटाने शिंदे गटातील आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली. या प्रकरणी न्यायालने लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे आदेश दिल्याने आता आज या प्रकरणी सुनावणी होत आहे. पुढचे चार दिवस ही सुनावणी चालेल. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर याबाबत सुनावणी होत आहे.