निवृत्ती बाबर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 05 जानेवारी 2024 : मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज आंदोलन करत आहे. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिली होती. या मुदतीमध्ये सरकारने या बाबतनिर्णय घेतला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज आक्रमक झाला आहे. येत्या 20 जानेवारीपासून मागे हटायचं नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. त्यासाठी मुंबईत आंदोलन केलं जाणार आहे. या आंदोलनासाठी मनोज जरांगे यांनी मैदानाची मागणी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी शिष्टमंडळाने परवानगी मागितली आहे. मुंबईत तिन्ही मैदानाच्या परवानगीसाठी शिष्टमंडळाने तीन दिवसापूर्वी परवानगी मागितली आहे. मुंबई पोलिसांकडे मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाने आंदोलनाच्या परवानगीसाठी पत्र व्यवहार केला आहे. आता काहीच दिवस शिल्लक असल्याने मुंबईतील सकाळ मराठा समाजाचे समन्वयक हे मनोज जरंगे पाटील यांना भेटण्यासाठी जालन्याला गेलं होतं. जरांगे पाटील यांनी मुंबईतील आपल्या सर्व समन्वयकांना तयारी करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर परवानगीसाठी पत्रव्यवहार आणि इतर तयारी देखील आता मुंबईतील समन्वयक करत आहेत.
दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मराठे ताकतीने एक झाले आहेत. पाठीमागच्या आयोगाचे निकष मागवावे लागतील. त्यांचे काय निकष काय आहेत, हे मी मागावणार आहे. आता मराठ्यांना हे जाणून बुजून करत आहेत का? मैदान मागण्याचा विषय ज्याचा त्याचा आहे. पण आम्ही मुंबई जाणार आहोत. शंभूराज देसाई यांच्या काही निरोप नाही. परंतु 20 जानेवारीपर्यंत चर्चेसाठी दारं खुली आहेत. 20 तारखेपूर्वी सरकारला आरक्षण द्यावंच लागेल, असं मनोज जरांगे यांनी जालन्यात बोलताना म्हटलं.
मनोज जरांगे पाटील सध्या गोदा काठच्या गावांचा संवाद दौरा करत आहेत आहेत. काल रात्री जरांगे पाटील कोठाळ गावात गेले असता त्यांच्या स्वागतासाठी 51 ट्रॅक्टरची रॅली काढत स्वागत करण्यात आलं. जरांगे पाटील या दौऱ्याच्या माध्यमातून मराठा समाजाला मुंबईतील मोर्चामध्ये येण्याचे आवाहन करत आहेत.