नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरून आमची कोणतीही पंचायत झालेली नाही असे सांगत शिंदे सरकारवर हल्लाबोल करत आहे. स्थानिक नागरिकांचा विरोध असतांना प्रकल्पाची प्रक्रिया केली जात असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्राचा हवाला देत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावत उद्धव ठाकरेच दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला जात होता. तोच आरोप फेटाळून लावत खासदार विनायक राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
विनायक राऊत म्हणाले, आमची कोणतीही पंचायत झालेली नाहीये. मिंदे सरकार आता जबरदस्ती करतंय लोकांना त्रास देतंय. भूमाफियाचे खिसे भरण्यासाठी हा प्रयत्न आहे असल्याचा आरोप केला आहे. मुंबईतल्या चाकरमान्यांच्या घरी जाऊन पोलीस फोटो घेत आहेत.
घरावर नोटीस बजावत आहेत, नेमकं काय चाललंय ? असा सवाल उपस्थित करत मुंबईतल्या लोकांना रेल्वे स्टेशनवरून पोलीस उचलून ढांबत आहेत असा दावा राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना ग्रामस्थांनी तीन वेळा पत्र लिहून भेटीची मागणी केली होती पण कोणतीही भेट झाली नव्हती.
पर्यायी जागेची शिफारस केली म्हणजे समर्थन केलं जातं असं नाहीये. ग्रामस्थांचं का ऐकलं जात नाहीये हा मुद्दा आहे. बैठकीला बोलवतात आणि तडीपारीच्या नोटीस पाठवल्या जात आहेत असेही विनायक राऊत म्हणाले.
ग्रामसभा ग्रामपंचायचीचे ठराव हे ऐकून घेणं गरजेचं होतं पण ते का ऐकलं गेलं नाहीये? मुर्दाड सरकारनं ठरवलं आहे की कोणतंही पत्र वाचायचं नाही पत्र फेकून द्यायचं. या सरकारमघ्ये ह्दय असेल तर त्या महिलांची विचारपूस करावी अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिसिंग आहेत. बडोद्याला जमिन द्यायची होती, तेव्हा एकही रुपया न देता बळाचा वापर केला गेला. चांगले प्रकल्प गुजरातला पाठवायचे आणि विनाशकारी प्रकल्पाला कोकण पाहिजे असा हल्लाबोलही विनायक राऊत यांनी केला आहे.
दरम्यान खासदार विनायक राऊत यांनी बोलत असतांना बारसू प्रकरणावर आपली भूमिका मांडत असतांना आंदोलनाचे संकेत दिले आहे, त्यामध्ये विनायक राऊत यांनी आमची पंचायत झाली नसल्याचा खुलासा करत शिंदे सरकारवर गंभीर आरोप करून आक्रमक पवित्रा घेतला आहे.