दादर | 23 सप्टेंबर 2023 : मुंबईतील दादर येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दादर परिसरातील एका इमारतीला आग (fire in building) लागून एका व्यक्तीचा मृत्यू ( one person dead) झाला आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून आगीच्या धुरामुळे गुदमरून एक व्यक्ती मृत्यूमुखी पडल्याचे समजते. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तर या एका महिलेला वाचवण्यात यश मिळाले आहे.
दादर पूर्वेकडील हिंदू कॉलनीतील एका 15 मजली निवासी इमारतीच्या 13व्या मजल्यावर शनिवारी सकाळी आग साडेआठच्या सुमारास ही आग लागली. आगीमुळे सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे त्या इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीचा श्वास गुदमरून तो बेशुद्ध झाला. त्याला तातडीने सायन रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सचिन पाटकर असे मृत व्यक्तीचे नाव असून ते 60 वर्षांचे होते.
दरम्यान आगीचे वृ्त्त समजताच अग्निशमन दल व पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.
( डिस्क्लेमर : ही बातमी अपडेट होत आहे.)