ट्रेन येताच टाळ्यांचा जोरदार कडकडाट अन् जागा पकडण्यासाठी झुंबड… मेगा ब्लॉकमुळे प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी

| Updated on: May 31, 2024 | 9:00 AM

मध्य रेल्वेच्या ३ दिवसीय महामेगाब्लॉकमुळे मुंबईकरांसाठी प्रवास करणे अत्यंत जिकीरीचे ठरणार असून शुक्रवार सकाळापासून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गुरूवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला हा विशेष ब्लॉक रविवार दुपारपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून प्रत्येक स्टेशनवर गर्दीचा महापूर पहायला मिळत आहे.

ट्रेन येताच टाळ्यांचा जोरदार कडकडाट अन् जागा पकडण्यासाठी झुंबड... मेगा ब्लॉकमुळे प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी
दरम्यान सर्वसामान्यांच्या सोयीसाठी बेस्ट 486 जादा बसेस चालवणार आहे.बेस्टच्या या बस सीएसएमटी, दादर, भायखळा, वडाळा आणि सायन स्थानकांवरून धावणार आहे
Follow us on

मुंबईकरांसाठी शुक्रवारची सकाळ उजाडली तीच गर्दीने…मध्य रेल्वेच्या ३ दिवसीय महामेगाब्लॉकमुळे मुंबईकरांसाठी प्रवास करणे अत्यंत जिकीरीचे ठरणार असून शुक्रवार सकाळापासून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गुरूवारी मध्यरात्री साडे बारापासून सुरू झालेला हा विशेष ब्लॉक रविवार दुपारपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र यामुळे अनेक गाड्या, लोकल्स रद्द करण्यात य़ेणार असून कामावर निघालेल्या प्रवाशांना मात्र मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेवर रोज सुमारे ७० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. आजपासून अनेक गाड्या रद्द झाल्याने लवकरात लवकर लोकल पकडून आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी लोकांनी स्टेशनवर मोठी गर्दी केली. लोकल ट्रेन्सही दुथडी भरून वाहत असून कल्या, डोंबिवली, ठाणे या स्थानकांवर पाय ठेवायलाही जागा नाहीये. मध्य रेल्वेच्या या ब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

६३ तासांचा मेगाब्लॉक

रेल्वे प्रशासनाकडून ठाणे ते सीएसटी दरम्यान तीन दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात फलाट क्रमांक 10 आणि 11 तर ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाच आणि सहाचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने घेतला हा जम्बो ब्लॉक सुरू आहे. यामुळे लोकलच्या एकूण 930 फेऱ्या रद्द करण्यात येणार असून शुक्रवारी 161, शनिवारी 534, तर रविवारी 235 लोकल फेऱ्या रद्द होतील. ऑफीसला जाणाऱ्या लोकलच रद्द झाल्याने प्रवास करायचा कसा असा प्रश्न लोकांच्या मनात असून त्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.

या ब्लॉकमुळे कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या काही गाड्या रद्द झाल्या आहेत. अपसाईड वरील स्लो व फास्ट लाईन सुरू आहे. काही प्रमाणात लोकल गाड्या रद्द केल्या असून सुरु असलेल्या लोकल गाड्या पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत. डाऊन साईडची फास्ट ट्रॅक वरील लोकल सेवा पूर्णपणे बंद आहे. स्लो ट्रॅक वर लोकल गाड्या उशिराने सुरु असल्याने मुंबई कडून कर्जत व कसाऱ्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

मध्य रेल्वेने मेगाब्लॉकची घोषणा केल्याने अनेक प्रवासी सकाळी घरातून लौकरच बाहेर पडले. मध्येच अडकायला लागू नये, गर्दीचा सामना करावा लागू नये म्हणून अनेक प्रवाशांनी सकाळी लौकरची गाडी पकडण्यास प्राधान्य दिले. मात्र तरीही अनेक गाड्या रद्द झाल्याने, तर काहींना विलंब झाल्याने लोकलमध्ये आणि स्टेशनवर गर्दीचा महापूर दिसत आहे. कुर्ला स्थानकातही अनेक लोकल उशिराने धावत आहेत.

ट्रेन येताच टाळ्यांचा जोरदार कडकडाट अन् जागा पकडण्यासाठी झुंबड

अंबरनाथ स्टेशनहून 8.27 ला सुटणारी ट्रेन आजच्या गोधंळामुळे सुमारे १०-१२ मिनिटं उशीराने आली. ८.४० च्या सुमारास आलेली ही ट्रेन पाहताच प्रवाशांची झुंबड उडाली. दोन दिवसापूर्वी एका मोटरमनचं रिटायरमेंट सोहळा होता. त्यामुळे गाडी फुलांनी सजवलेली होती. मात्र ही ट्रेन स्टेशनवर येताच ताटकळलेल्या प्रवाशांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आणि नेहमीच्या पद्धतीने गाडी पूर्णपणे थांबण्याच्या आधीच आतमध्ये पटापट उड्या टाकून सीट मिळवण्यासाठी धडपड सुरू केली. मेगाब्लॉकमुळे बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे या स्थानकांवर थोड्याफार फरकाने हेच चित्र दिसत होते. स्टेरशनवर गर्दी आणि लोकलमध्येही गर्दीच. गच्च भरलेली लोकल स्टेशनवर थांबायच्या आतच लोकांची आत शिरण्याची धडपड सुरू होती.

लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द

मध्य रेल्वेच्या या जम्बो मेगाब्लॉकमुळे फक्त लोकल सेवेवरच परिणाम झालेल नाही तर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले आहे. मुंबई ते पुणे, नागपूर, अमरावती, कोल्हापूर अशा इंटर सिटी ट्रेनसह लांबपल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई- हावडा दुरांतो एक्स्प्रेस तब्बल सात तास उशिराने धावणार असून सीएसएमटी ऐवजी दादर स्थानकातुन रात्री एक वाजता सुटणार आहे.

अतिशय महत्वाचे काम असेल, फारच आवश्यकता असेल तरच मुंबईकरांनी प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

मुंबईसाठी पुणे एसटी विभागाकडून जादा गाड्या

मुंबईतील मध्य रेल्वेच्या महा मेगाब्लॉकमुळे पुणे एसटी विभागाकडून मुंबईसाठी जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी 40 जादा बसेस सोडण्यात येतील . रेल्वे गाड्या रद्द असल्याने एसटीवर प्रवाशांचा ताण पडेल हेच लक्षात घेऊन सटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून जादा गाड्याचं नियोजन करण्यात आलं आहे. मुंबईसाठी पुणे स्टेशन येथून 40 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.