मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सकाळपासून सुरू असलेल्या चर्चांवर दुपारी प्रतिक्रिया दिली आहे. पाच ते सहा तास सुरू असलेल्या चर्चांवर अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत असताना संजय राऊत आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका मांडत असताना आमच्या पक्षाबद्दल का बोलताय असा समान उपस्थित करत अजित दादा यांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचे तुम्हाला कोणी वकील पत्र दिले ? आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला ? असे सवाल उपस्थित करत नाव न घेता अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
खरंतर अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन करतील अशी चर्चा सुरू असताना संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली होती. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फोडू शकतं अशी शंका संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.
यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संदर्भात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यापूर्वी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचा कुणाला अधिकार नाही असेही म्हंटले होते. त्यावेळी अजित पवार यांनी नाव न घेता थेट इशारा दिला होता.
त्यात आज सुरू असलेल्या चर्चा आणि त्यावर संजय राऊत यांनी केलेले भाष्य बघता अजित पवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. संजय राऊत यांचे नाव न घेता आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचा तुम्हाला कोणी वकील पत्र दिले आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
पुढे अजित पवार म्हणाले आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचे काम आमचे प्रवक्ते करतील. इतरांनी त्यावर बोलू नये. इतर पक्षाचे प्रवक्ते बनू नका असा सल्ला देत असतांना एकनाथ शिंदे यांच्या नेत्यावरही अजित पवार यांनी थेट नाव घेऊन हल्लाबोल केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांना कुणी आमच्या पक्षाबद्दल अधिकार दिला आहे. अजित पवार ला घेणार का? नाही घेणार ? हे काय चाललंय म्हणत अजित पवार यांनी थेट हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा आधार घेत स्पष्टीकरण दिले आहे.
खरंतर संजय शिरसाठ, संदीपान घुमरे, संजय गायकवाड, यांनीही अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर भाष्य केले होते. त्यावर अजित पवार यांनी ठणकावले आहे. अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याच्या चर्चेवर बोलत असतांना हा संताप व्यक्त केला आहे.